जुन्या वादातून नशिराबाद येथे गोळीबार; एक ठार, एक जखमी

गेल्या ११ महिन्यांपासून मयत धम्म सुरडकर हा कारागृहात होता. विशेष म्हणजे धम्म याचा आज २२ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

    जळगाव: जुन्या वादातून जामिनावर सुटून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना नशिराबाद येथील उड्डाणपुलाच्या खाली नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

    याबाबत अधिक माहिती अशी की, धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर वय २० राहणार पंचशील नगर भुसावळ हा आपल्या वडिल मनोहर सुरडकर यांच्यासह जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी क्रमांक (एमएच १९ एव्ही ९६५६) जात असताना काल सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्ल्यात धम्म सुरडकर हा जागीच ठार झाला आहे. तर सोबत असलेले वडील मनोहर सुरडकर हे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण मयत धम्म हा काल सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटून घरी जात असताना ही घटना घडली आहे.

    गेल्या ११ महिन्यांपासून मयत धम्म सुरडकर हा कारागृहात होता. विशेष म्हणजे धम्म याचा आज २२ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.