नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून पुर्णत: संचारबंदी, कोरोनाचा धोका वाढला

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपासून ते १५ एप्रिल २०२१ रोजी मध्यरात्रीपर्यंत पुर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थारपन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांकडे पुढील पाच दिवस अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

    नंदुरबार : राज्यात कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. एकीकडे राज्यात उद्या मध्यरात्रीपासून रात्रीच्या वेळी जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले असताना नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून पुर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे आदेश जारी केले आहेत.

    कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपासून ते १५ एप्रिल २०२१ रोजी मध्यरात्रीपर्यंत पुर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थारपन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांकडे पुढील पाच दिवस अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व दुकाने आज व उद्या बंद राहणार असून वाढत्या कोरोनामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

    सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने, शॉपींग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील. करमणुक उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रिडा संकुले, मंगल कार्यालये, खुले लॉन्स, सभागृह, असेंम्ब्ली हॉल बंद राहतील. सर्व हॉटेल/रेस्टॉरंट, लॉजिंग, परमिट रूम बियरबार व इतर सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील.
    सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व इतर सर्व गर्दी होणारे कार्यक्रम बंद राहतील. धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्व सामान्यांसाठी बंद राहतील, तथापि धर्मगुरु, पुजारी यांना नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम करता येतील.

    शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून औषधाची दुकाने, रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील. भाजीमंडई सकाळी ६ ते ११ या वेळेत सुरू राहील, मात्र एका आड एक ओटे राहतील. भाजीपाला आणि किराणा वस्तूंच्या घरपोच सेवेला प्राधान्य देण्यात यावे. दुध वितरकांना सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत दूध वितरणास परवानगी असेल. दुध वितरकांनी संबंधित तहसिलदार यांचेकडून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे.