Relu Vasave Anganwadi worker from Nandurbar rows 18 kilometres everyday to interior villages

    नंदूरबार : कर्तव्य दक्षता काय असते हे नंदुरबारच्या एका अंगणवाडी सेविकेने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. नावेच्या माध्यमातून १८ किलोमीटरचा प्रवास करत त्या आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होतात.

    रेलू वासवे(वय २७ वर्षे) असे या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. रेलू ह्या नंदुरबार जिल्ह्यातील एक आदिवासी गाव असलेल्या चिमलखाडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. रेलू यांना या गावात येण्यासाठी रस्ते मार्ग उपलब्ध नसल्याने नावेच्या मदतीने त्या आदिवासी मुले आणि गर्भवती महिलांपर्यंत मदत पोहचवतात.

    कोरोना आदिवासी मुलांच्या पालकांना तसेच गर्भवती महिलांना अंगणवाडी केंद्रांपर्यंत जाता येत नाही. अशा परिस्थितीत रेलु यांनी स्वत:च मुले आणि महिलांपर्यंत भोजन पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

    सहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिलांचे आरोग्य आणि वाढीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी रेलु यांच्यावर आहे. नियमित मुलांचे वजन घेणे तसेच सरकारकडून देण्यात येणारा पोषण आहार त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम त्या करतात.

    येथील २५ नवजात आणि कुपोषित बालकांसह सात गर्भवतींना योग्य पोषण मिळावे यासाठी रेलू आपला जीव धोक्यात घालून एप्रिल महिन्यापासूनच आठवड्यातील पाच दिवस नावेच्या माध्यमातून १८ किलोमीटरचा प्रवास करत आहेत.

    मार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर नर्मदा नदीच्या दुसऱ्या टोकावरील दोन भागांतील आदिवासींनी अंगणवाडीमध्ये येणे बंद केले. रेलू यांनी नावेच्या माध्यमातून आदिवासींकडे पोहोचण्याचा निर्णय घेतला.

    एका मच्छीमाराने रेलू यांनी या कामासाठी एक छोटीशी नाव उधार दिली आहे. सकाळी ७.३० वाजता रेलू अंगणवाडीत पोहोचतात आणि दुपारपर्यंत तिथे काम करतात. दुपारी भोजन केल्यानंतर एका तासानंतर त्या आपली नाव घेऊन वाड्यांमध्ये जातात. त्या आपल्यासोबत भोजन आणि मुलांचे वजन करण्यासाठीची उपकरणे घेऊन जातात. नावेच्या माध्यमातून नदी पार केल्यानंतर त्या डोंगराळ भागात पायीच प्रवास करतात. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.