akhil bhartiya marathi natya parishad

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या(Akhil Bhartiya Natya Parishad) पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

    नाशिकः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या(Akhil Bhartiya Natya Parishad) पुरस्कारांची घोषणा झाली आहे. पुरस्कार जाहीर(Awards Announcement) झालेल्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते दीपक करंजीकर, अभिनेत्री विद्या करंजीकर, दिग्दर्शक प्रदीप पाटील, लेखक दत्ता पाटील यांच्यासह अन्य रंगकर्मींच्या नावाचा समावेश आहे.अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र निकम यांनी नाट्य परिषदेच्या पुरस्काराची घोषणा केली.

    यावेळी निकम म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या वर्षी सारे व्यवहार ठप्प होते. त्यामुळे गेल्यावर्षी पुरस्कारही प्रदान करण्यात आले नाहीत. यंदा रंगभूमी दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकमधील साहित्य संमेलन झाल्यानंतर या पुरस्काराने मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेच्या विश्वस्तपदी सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे यांचा या पुरस्कार सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे.

    पुरस्कार जाहीर झालेल्यांची यादी
    दीपक करंजीकर यांना दत्ता भट स्मृती अभिनय पुरुष पुरस्कार, विद्या करंजीकर यांना शांता जोग स्मृती अभिनेत्री स्त्री पुरस्कार, प्रदीप पाटील यांना प्रभाकर पाटणकर स्मृती दिग्ददर्शन पुरस्कार, दत्ता पाटील यांना नेताजी तथा दादा भोईर स्मृती लेखन पुरस्कार, सुरेश गायधनी यांना वा. श्री. पुरोहित स्मृती बालरंगभूमी पुरस्कार जाहीर झाला आहे. धनंजय वाखारे यांना जयंत वैशंपायन स्मृती सांस्कृतिक पत्रकारिता पुरस्कार, विनोद राठोड यांना गिरीधर मोरे स्मृती प्रकाशयोजना पुरस्कार, जितेंद्र देवरे यांना रामदास बरकले स्मृती लोककलावंत पुरस्कार, राजेंद्र जव्हेरी यांना शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार, राजेंद्र तिडके यांना विजय तिडके स्मृती रंगकर्मी कार्यकर्ता पुरस्कार, नारायण चुंबळे, निवृत्ती चाफळकर, संगीतकार संजय गीते आणि नितीन वारे यांना शंकरराव बर्वे स्मृती विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे नाट्य परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

    नाशिकमध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ३ ते ५ डिसेंबरमध्ये भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार आहे. साहित्य संमेलनाच्या सोहळ्यानंतर नाट्य परिषद पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम घेणार आहे. त्यावेळी मंत्री उदय सामंत यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती निकम यांनी दिली.