अमोल पाटील यांना साश्रूनयनांनी निराेप ; ‘अमर रहे’च्या घाेषणांनी परिसर दुमदुमला

नुकत्याच दिवाळी सणात अमोल बोलठाण येथे सुट्टीवर आला होता. सुट्टी संपल्यावर कर्तव्यावर परत जातांना आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्यांची चिमुकलीला तो सोबत घेऊन गेला होता. दरम्यान, विरपूर सीमेवर त्यांना वीरमरण आल्याची माहिती त्याच्या लहान भावाला मिळाल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला.

    नांदगाव : बिहारमध्ये नेपाळ सीमेलगत बीरपूर येथे कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आलेले अमोल पाटील (३०) या अमर जवानावर काल (सोमवार)त्यांच्या जन्मगावी नांदगावच्या बोलठाण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या लहान भावाने अग्निडाग दिला. यावेळी भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, जब तक सूरज चांद रहेगा अमोल तेरा नाम रहेगा आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला हाेता.

    जनसमुदाय लाेटला
    मकरसंक्रांतीच्या दिवशी अमोल पाटील नेपाळ सीमेवर कर्तव्य बजावत असतांना उच्च दाब असलेली विजेची तार पडल्यामुळे शॉक लागून अमोलला वीरमरण आले होते. काल त्यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी बोलठाण येथे आणण्यात आला होता. वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील जनसमुदाय लोटला होता. अश्रू नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. अमोलच्या निधनाने संपूर्ण नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली असून आमदार सुहास अण्णा कांदे, नगराध्यक्ष बाबी काका कवडे यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी वीर जवानाच्या प्रथिववर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

    ४५ व्या बटालियनमध्ये कार्यरत
    अधिक वृत्त असे की, मकरसंक्रांतीच्या दिवशी अमोल बिहार-नेपाळ जवळ विरपूर सीमेवर तैनात असतांना त्यांना ११ हजार के. व्ही. विजेच्या तारेचा जोरदार धक्का लागून अमोलसह इतर दोन जवानांना वीर मरण आले. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच जन्मगाव बोलठाणसह संपूर्ण नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली होती. मनात देश सेवा करण्याची जिद्द आणि चिकाटीमुळे अमोल २०१५ मध्ये सैन्यदलात भर्ती झाल्यानंतर तो ४५ व्या बटालियनमध्ये दाखल होऊन देशासाठी कर्तव्यावर होता.

    …अन‌ सर्वांचेच अश्रू अनावर झाले
    नुकत्याच दिवाळी सणात अमोल बोलठाण येथे सुट्टीवर आला होता. सुट्टी संपल्यावर कर्तव्यावर परत जातांना आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्यांची चिमुकलीला तो सोबत घेऊन गेला होता. दरम्यान, विरपूर सीमेवर त्यांना वीरमरण आल्याची माहिती त्याच्या लहान भावाला मिळाल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. रविवारी त्याचे पार्थिव विमानाने औरंगाबादला आणण्यात आले तेथे सैन्य दलातील जवानांनी त्याला सलामी दिली आज सकाळी त्याचा पार्थिव बोलठाणला आणण्यात आला.यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या ९ महिन्याच्या चिमुकलीने जेव्हा पार्थिववर डोकं ठेवले ते पाहून उपस्थित जनसमुदायाला अश्रू अनावर झाले होते.

    आमदार कांदेंकडून मदत जाहीर
    दरम्यान, तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अमर जवान अमोलपाटील याच्या पार्थिव वर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी आमदार कांदे यांनी वीर जवान अमोलची विरपत्नी आणि विरकन्या यांच्या नावे एक जबाबदार भाऊ म्हणून ५ लाख रुपये त्यांच्या नावे एफडी करण्याचे जाहीर केले. शिवाय शासकीय सर्व योजना पूर्ततेसाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. त्या योजनांची पूर्तता आपल्या घरी येऊन मी पूर्ण करण्याबरोबर अमर जवान अमोल पाटील यांचे बोलठाणला भव्य स्मारक उभारण्याचे त्यांनी आश्वासन दिले.