शेतकऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या महावितरणच्या मुजोर नोकराला अटक करा अन्यथा जिल्हाभर आंदोलन ; शेतकरी संघटना आक्रमक

मुजोर नोकराला तत्काळ अटक करण्याची मागणी

    कळवण : एकीकडे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे.दुसरीकडे महावितरण कडून सक्तीची वीजबिल वसुली सुरू असून वीज कनेक्शन कट केले जात आहेत.मात्र काही ठिकाणी वीज बिल भरूनही शेतकऱ्यांना महावितरण च्या मुजोर अधिकाऱ्यांकडून अर्वाच्य भाषेत दमदाटी केली जात असल्याचा प्रकार समोर आला असून दिंडोरी तालुक्यातील महावितरण च्या बोरकर नामक अभियंत्याने मंडकीजांब येथील प्रगतशील शेतकरी बोरांडे यानां शिवीगाळ केल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक न झाल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

    महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातील हा प्रकार असून लाईट बिल भरून वीज जोडणी कधी करणार अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला महावितरण मध्ये अभियंता म्हणून काम करणाऱ्या बोरकर नावाच्या सरकारी नोकराने अर्वाच्य भाषेत आई वरून शिवीगाळ करून कार्यालयात ये तुझे तोंड फोडतो असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्याला शासकीय सेवेतून तत्काळ बरखास्त करून त्यांना मिळणाऱ्या शासकीय सेवा त्वरित बंद कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच बोराडे यांनी शेती पंपाचे बिल भरून सुद्धा त्यांचे वीज प्रवाह बंद करून ठेवला म्हणून बोराडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    शेतकऱ्यांना आई बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या सरकारच्या या मुजोर नोकरावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का हा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.येत्या दोन दिवसात शेतकऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या या सरकारी नोकरास अटक न झाल्यास शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पुर्ण नाशिक जिल्ह्यात विजमहावितरण वर आंदोलन छेडेल असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार,जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी दिला आहे.