नगरसेवक फरार : मालेगावी बायाेडिझेलसह विस्फाेटक द्रव्य जप्त

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर महसूलचे अधिकारी आणि विशेष पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका टँकरमधून बायोडिझेल सदृश्य इंधन पंपाच्या साहाय्याने काढताना शेख अनिस शेख रशीद (३६) रा. गुलशेर नगर, मालेगाव हा मिळून आला. मालवाहू वाहनांमध्ये इंधन म्हणून भरण्यासाठी हे द्रव्य ड्रममध्ये साठवत असल्याचे त्याने सांगितले.

    मालेगाव : शहरातील मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या स्टार हॉटेल शेजारील भावना रोड लाईन्स नावाच्या निळ्या पत्राच्या गाळ्यामध्ये पोलिस उपमहानिरीक्षक यांचे विशेष पथक व महसूल विभागाने केलेल्या कारवाईत बायोडिझेल सदृश्य २३ हजार २०० लिटर विस्फोटक द्रव्यासह ४३ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून दोघे सूत्रधार फरार झाले आहेत. यात विद्यमान नगरसेवक एजाज बेग यांचा समावेश आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. येथील महापालिकेचे विद्यमान नगरसेवकाशी निगडित व्यक्तीचा बायोडिझेल सदृश्य बेकायदेशीर इंधन साठा शहरात मिळून आल्याने शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

    सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर महसूलचे अधिकारी आणि विशेष पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका टँकरमधून बायोडिझेल सदृश्य इंधन पंपाच्या साहाय्याने काढताना शेख अनिस शेख रशीद (३६) रा. गुलशेर नगर, मालेगाव हा मिळून आला. मालवाहू वाहनांमध्ये इंधन म्हणून भरण्यासाठी हे द्रव्य ड्रममध्ये साठवत असल्याचे त्याने सांगितले. तसेच सदर पंपाचे एजाज बेग अजीज बेग हे मालक असल्याचे देखील त्याने चौकशी दरम्यान सांगितले. याप्रकरणी नायब तहसीलदार डी.बी.वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून मालक बेग हे फरार झालेत.

    यावेळी पोलिसांनी जवळचं जे.के.मोटर्सच्या पाठीमागे असलेल्या एका पत्राच्या गोडावूनमध्येही पाहणी केली असता या ठिकाणी जावीद खान अहमद खान (३९) रा. चमन नगर, आझादनगर व शहजाद खान सलीम खान (२४) रा. राजा नगर, मालेगाव हे दोघे देखील ड्रममध्ये इंधन भरताना आढळून आले. सदर इंधन जुबेर खान नासीर खान याचा असल्याचे सांगितले. जुबेर खान देखील फरार आहेत.पथकाने दोन्ही गोडावून सील केले आहेत. त्यातील ड्रम, टॅंकरमध्ये २३ हजार २०० लिटर बायोडीजेल सदृश्य विस्फोटक द्रव्य, अप्रमाणित मशीन असा ४३ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असून पवारवाडी पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.