मालेगाव मनपा आयुक्तांवरील अविश्वास : एमआयएमची तटस्थ भूमिका तर जनता दल प्रस्तावाच्या बाजूने

    मालेगाव : येथील महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्याच्या मंजुरीसाठी गुरुवार दि.२५ रोजी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून मालेगावात राजकीय घडामोडीना वेग आला असून एमआयएमचे नगरसेवक डॉ. खालिद परवेज यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करीत तटस्थ राहणार असल्याचे सांगितले तर जनता दलाचे मुश्तकिम डीग्नीटी यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार असल्याची भूमिका घेतली आहे.

    आयुक्त कासार यांच्यावर दाखल अविश्वास प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आज महापौर ताहेरा शेख यांनी गुरुवारी विशेष महासभेचे आयोजन केले आहे. दरम्यान या कारणावरून शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. एमआयएमचे नगरसेवक डॉ. खालिद परवेज तसेच जनता दलाचे मुश्तकिम डीग्नीटी यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे वेगवेगळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. डॉ. खालिद यांनी सत्ताधारी काँग्रेसने ठेकेदारी करून महापालिकेची आर्थिक लुट केली असून आयुक्तांवर दाखल अविश्वास हे ढोंगीपणाचे लक्षण असल्याचा उल्लेख केला. आयुक्तांविरोधात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करणारे महापौर ताहेरा शेख व रशीद शेख यांनी घुमजाव करीत आपली तक्रार मागे घेतली.

    आयुक्तावरील आरोप हे काँग्रेसने ठेका घेवून आर्थिक लूट लपविण्याचा व जनतेच्या डोळ्यात धुळफेक फेकण्याचा प्रकार असून सत्ताधारी सेना व भाजपाने अविश्वास प्रस्तावाबाबत विचार करुन मतदान करावे, अविश्वास प्रस्ताव येण्यापूर्वी देण्यात आलेले सर्व ठेके रद्द करुन अविश्वास प्रस्ताव सादर करावा, असे डॉ. खालीद यांनी यावेळी सांगितले.

    तर जनता दलाचे नगरसेविका शान-ए- हिंद, मुश्तकिम डीग्नीटी, रिजवान खान, अब्दुल बाकी यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने सभागृहात मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले. आयुक्त कासार यांनी मनपाची आर्थिक लूट केली असून त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. वॉटरग्रेस कंपनीचा स्वच्छता ठेका, गिरणा पंपीग स्टेशन वरील पंप दुरुस्ती, वाहन खरेदी आदी प्रकार संशयास्पद असून जनता दल अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार आहे.