महिलांचा अनादर सहन करत नाही ; आम आदमी पक्षातून भावेंची हकालपट्टी

पक्षाकडून धाडण्यात आलेला संदेश अधिकृत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. यानुसार पक्षाच्या निदर्शनास आले आहे की, पक्षाचे नाशिक शहराचे कार्याध्यक्ष व राज्य समिती सदस्य जितेंद्र भावे यांनी एका महिला शिक्षण अधिकाऱ्यांशी वाद घालताना अयोग्य भाषा वापरली होती. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्वाचे पथक नाशिकला पाठवण्यात आले होते.

  नाशिक : आम आदमी पार्टी महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवते आणि पक्षाच्या कोणत्याही सदस्याकडून महिलांचा कोणत्याही प्रकारचा अनादर सहन करत नाही. त्यामुळे महिलांचा अनादर करणाऱ्या जितेंद्र भावे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

  महिला अधिकाऱ्यांशी वाद
  पक्षाकडून धाडण्यात आलेला संदेश अधिकृत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. यानुसार पक्षाच्या निदर्शनास आले आहे की, पक्षाचे नाशिक शहराचे कार्याध्यक्ष व राज्य समिती सदस्य जितेंद्र भावे यांनी एका महिला शिक्षण अधिकाऱ्यांशी वाद घालताना अयोग्य भाषा वापरली होती. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्वाचे पथक नाशिकला पाठवण्यात आले होते. हे पथक आल्याबाबत भावे यांनाही कल्पना होती. या पथकाने सर्व संबंधित व्यक्तींना भेटून त्यांच्याशी चर्चा केली.

  तत्काळ प्रभावाने अमलबजावणी
  एवढे झाल्यानंतरदेखील भावे यांना यांच्या वक्तव्याबद्दल आणि त्यानंतर केलेल्या कृतीबद्दल अजिबात पश्चाताप होत नसल्याचे निरीक्षण या पथकाकडून नोंदवले गेले. त्यामुळे भावे यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात येत असून त्यांची तत्काळ प्रभावाने त्यांची सर्व पदांवरून मुक्तता करण्यात अाल्याची माहिती राज्य सचिव शिंदे यांनी दिली.

  मला पक्षातील वरिष्ठांच्या सहीनिशी कुठलेही अधिकृत लेटर मिळालेले नाही. सोशल मीडियात कुणी काहीही पसरवते त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, असे काही नाही. माझे काम सुरु आहे.

  - जितेंद्र भावे, आप, नाशिक