आमदार कांदेंना डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन, भुजबळांचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नांदगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर तहसील कार्यलयात झालेल्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत एकच गोंधळ उडाला होता. बैठकीनंतर आमदार कांदे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. याच प्रकरणी आमदार कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

  नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते व आमदार सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजच्या पुतण्याने धमकी दिल्याचं कांदे यांनी सांगीतलं आहे. या प्रकरणी आमदार कांदे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या फोनवर समोरील व्यक्तीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यास सांगितले आहे. याचिका मागे न घेतल्यास कुटुंबासाठी चांगले होणार नाही. असं म्हटलं आहे.

  आमदार सुहास कांदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला आणि फोन करणाऱ्याने स्वत: ची ओळख अक्षय निकाळजे, छोटा राजनचा पुतण्या म्हणून सांगितली. निकाळजे याने कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात डीपीडीसीच्या निधी वाटपासंदर्भात दाखल केलेली रिट याचिका मागे घेण्यासाठी धमकावलं. याचिका मागे न घेणं तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी चांगलं नसेल, असं म्हटल्याचा आरोप कांदे यांनी केला आहे.

  या प्रकरणाची नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ दखल घेत दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत.

  याबाबत भुजबळ म्हणाले की, ‘आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली आणि मी ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नाही.’ असं मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

  दरम्यान, नांदगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात आपतकालीन निधीच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली आणि पालकमंत्र्यांचा दौरा चांगलाच वादळी ठरला.

  पालकमंत्री भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तहसील कार्यलयात झालेल्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत एकच गोंधळ उडाला होता. बैठकीनंतर आमदार कांदे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. याच प्रकरणी आमदार कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.