महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं; संजय राऊतांचा सल्ला

सरकारला दीड वर्ष झाले पण आता आपले पाय जमिनीवर आहेत का ? हे सरकारमधील प्रत्येक घटकानं तपासले पाहीजे. यात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मात्र पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असतो. पोलिसांकडे आपण कणा म्हणून पाहतो, असंही राऊत म्हणाले.

    मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले मुंबई पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. या प्रकरणावरुन आता राज्यातील राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. विरोधी पक्षांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याचं पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

    संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात नक्कीच हा चर्चेचा विषय आहे. नक्कीच सनसनाटी आणि खळबळजनक पत्र आहे. लोक म्हणतात हा लेटर बॉम्ब मात्र यात सत्यता किती आहे हे मुख्यमंत्री आणि पवार साहेब तपासून बघतील. या प्रकरणी स्वतः अनिल देशमुख यांनी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अशा प्रकारचे आरोप होत आहेत हे दुर्दैवी असल्याचं राऊतांनी व्यक्त केलं.

    संजय राऊतांचा सरकारला सल्ला

    दरम्यान यावेळी राऊतानी सरकारला सल्ला दिला. म्हणाले की, ज्यांनी हे सरकार येण्यासाठी खारीचा वाटा उचलला अशा आमच्या सारख्यांसाठी हे धक्कादायक आहे. सरकारला दीड वर्ष झाले पण आता आपले पाय जमिनीवर आहेत का ? हे सरकारमधील प्रत्येक घटकानं तपासले पाहीजे. यात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मात्र पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असतो. पोलिसांकडे आपण कणा म्हणून पाहतो, असंही ते म्हणाले.