ऊर्जामंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; राजू शेट्टी संतापले

बाळासाहेब बाबुराव ठुबे या बळीराजाने मात्र द्राक्ष पीक डोळ्यांसमोर करपू लागलं म्हणून हजार रूपयाच्या थकबाकीसाठी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे उर्जामंत्री आणि महावितरणच्या संबधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाचं पाहिजे, असं  ट्विट राजू शेट्टींनी केलं आहे.

    नाशिक : नाशिक जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये द्राक्षाची बाग होती. आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज तोडली होती. ४ दिवसांपासून बंद असलेला डीपी पाहून शेतकरी चिंतेमध्ये होता आणि पुन्हा अवकाळी पाऊस झाला त्यामुळे ते आणखी जास्त चिंतेत होते. लॉकडाऊनच्या बातम्यामुळे द्राक्षांचा भावही बाजारात घटला होता. त्यामुळे, बाबासाहेब ठुबे या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेनंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    दरम्यान बाळासाहेब ठुबे यांच्या पत्नी कोथींबीर विकण्यासाठी गावामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी बाळासाहेब हे विषारी औषध घेऊन आपल्या शेतीतील दाक्षाच्या बागेत गेले. त्या ठिकाणी ते औषध त्यांनी प्राशण केलं. आणि काही वेळानंतर बाळासाहेब यांच्या पत्नी आल्या असता त्यांना पाहून धक्का बसला. त्यावेळी त्या ठिकाणच्या नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. मात्र रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी जीव सोडला. या घटनेनंतर राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.

    राजू शेट्टी म्हणाले की, राज्यकर्त्यांनो कोरोनाच्या नावाखाली तुम्ही हजारो कोटीचा घोटाळा केला. मंत्र्यांच्या दालनावरती कोट्यावधी रूपयाचा चुराडा केलात. संगनमताने जनतेच्या खिशातून १०० कोटी लुटीसाठी सर्वजण सैराठ झालात. खेडगांव ता. दिंडोरी येथील बाळासाहेब बाबुराव ठुबे या माझ्या बळीराजाने मात्र द्राक्ष पीक डोळ्यांसमोर करपू लागलं म्हणून हजार रूपयाच्या थकबाकीसाठी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे उर्जामंत्री आणि महावितरणच्या संबधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाचं पाहिजे, असं  ट्विट राजू शेट्टींनी केलं आहे.