गोदावरी नदीला महापूर; गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम

गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला असून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे

    नाशिक: गेल्या चोवीस तासापासून नाशिकमध्ये सुरु असलेला पावसाचा जोर अद्यापही काम आहे. मुसळधार पावसामुळे धरणं भरल्याने गोदावरी नदीला  महापूर आला असून नदीने रौद्ररूप धारण केले आहे.गंगापूर धरणातून १५ हजार क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. शहरातील बाजार पेठेत पाणी शिरले असून गोदाकाठावरील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. सराफ बाजारही पाण्याखाली गेलयामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे.

    नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे . गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला असून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

    नांदगावची शकांबरी, लेंडी, मन्याड, मनमाड शहरातून वाहणारी पांझन, रामगुळणा मालेगावची गिरणा, मोसम यासह इतर नद्यांना पूर आले असून काहींनी तर रौद्ररूप धारण केल्याचे चित्र आहे. या भागातील अनेक रस्ते, छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे गाव, वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटला असून शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे शेकडो हेक्टरवरील कांदा, कांद्याचे रोप, मका, बाजरी, भुईमूग, कापूस यासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून गुलाब वादळाच्या रूपाने आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो नागरिक, शेतकरी संकटात सापडले आहेत.