…आणि बिबट्याचे दोन बछडे पोहोचले आईच्या कुशीत !

निफाड तालुक्यातील करंजी येथे सोमवारी दुपारी काळू फकिरा अडसर यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना मजुरांना दोन बिबट्याची बछडे आढळून आले. रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान मादी त्याठिकाणी आली. दोन्ही बछड्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी घेऊन गेल्याची घटना वनविभागाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

लासलगाव  : निफाड तालुक्यातील करंजी येथे ऊसाच्या शेतात दोन बछडे आढळून आले. येवला वनविभागाच्या निफाड शाखेने दोन्ही बछडे पुन्हा मादीच्या स्वाधीन केल्याची घटना वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. करंजी या भागात मादी आणि दोन बछडे असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने पिंजरा लावून मादी आणि बछड्याना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

निफाड तालुक्यातील करंजी येथे सोमवारी दुपारी काळू फकिरा अडसर यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना मजुरांना दोन बिबट्यांचे बछडे आढळून आले. याची माहिती वनविभागाला देताच वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व वनपाल भागवत जाधव, वनरक्षक सुनील महाले, वनरक्षक गोपाळ हरगावकर, वन सेवक भैय्या शेख, हे करंजी येथे उसाच्या शेतात दाखल होत दोन्ही बिबट्याची बछडे ताब्यात घेत निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत सुरक्षितरीत्या आणून वैद्यकीय तपासणी केली.

एक नर तर दुसरी मादी जातीचा बछडा असून दोन्ही तंदुरुस्त असल्याचे नाशिक मुख्य वनरक्षक तुषार चव्हाण, उपवन रक्षक पूर्व विभाग, सुजित नेवसे यांना माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने या दोन्ही बछड्याना पुन्हा उसाच्या शेतात जाळी खाली छाकून ठेवले असतात रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान मादी त्याठिकाणी आली. दोन्ही बछड्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी घेऊन गेल्याची घटना वनविभागाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.