संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

दिंडोरी तालुक्यात ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याने वातावरण दहशतीचे असून, मेंढपाळावरील हल्ल्यापाठोपाठ दीपावली सणानिमीत्ताने घराच्या ओट्यावर पणती लावणाऱ्या आठ वर्षीय बालकावर झडप घालून बिबट्याने त्याला ठार केले.

    वणी : दिंडोरी तालुक्यात ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याने वातावरण दहशतीचे असून, मेंढपाळावरील हल्ल्यापाठोपाठ दीपावली सणानिमीत्ताने घराच्या ओट्यावर पणती लावणाऱ्या आठ वर्षीय बालकावर झडप घालून बिबट्याने त्याला ठार केले आहे. ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना घडल्याने निळवंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार सुरु आहे. भक्ष्यांच्या शोधार्थ बिबट्या कुत्रे, वासरु व इतर प्राण्यांना लक्ष करत असल्याची माहिती परिसरातील शेतकरी वर्गाने दिली. यामुळे रात्री-अपरात्री पिकांना पाणी देणे व शेतीकामाचे नियोजन आखण्यासाठी सूर्यास्तानंतर शेतीक्षेत्रात कोणी जाईनासे झाले असून, शेतमजुरांचीही पाचावर धारण बसली आहे. निळवंडी येथे घराच्या ओट्यावर पणती लावणाऱ्या गुरु खंडू गवारी या बेसावध असलेल्या आठ वर्षीय बालकावर सायंकाळच्या सुमारास बिबट्याने झडप घालून त्याला लक्ष्य केले. त्यात या बालकाचा अंत झाला.

    घराच्या मागील बाजूस असलेल्या ऊसाच्या क्षेत्रात बालकाला नेऊन बिबट्याने त्याला ठार केल्याचे उघड झाले. गेल्या वर्षी शाळकरी मुलावर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यात मुलगा ठार झाला होता. दरम्यान, निळवंडी येथील घटनेनंतर वनाधिकारी अशोक काळे घटनास्थळी पोहचले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात बालकास तपासणीसाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.