मनमाडला कांदा गडगडला बळीराजा हवालदिल 

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे साठवून ठेवलेल्या कांद्यापाठोपाठ कांदा रोप आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे एका एकरात निघत असलेल्या कांद्याचे उत्पादन १५ ते २० टक्क्यावर आले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सुधारणा होऊन कांद्याला प्रती क्विंटल कमीतकमी ७५१ रुपये जास्तीतजास्त २ हजार ६८६ रुपये तर सरासरी २ हजार २२५ रुपये इतका भाव मिळत होता.

    मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडल्याने बळीराजा हवालदिल झाला अाहे. पंधरा दिवसांपूर्वी ज्या कांद्याला प्रति किलो २१ रुपये इतका भाव मिळाला असताना त्याचा कांद्याला आज सरासरी ६ रुपये ५० पैसे भाव मिळाला. सध्या जो भाव मिळत आहे. त्यात पिकावर केलेला खर्च देखील निघत नाही. आवक जास्त तर मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

    अतिवृष्टीचे संकट
    गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे साठवून ठेवलेल्या कांद्यापाठोपाठ कांदा रोप आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे एका एकरात निघत असलेल्या कांद्याचे उत्पादन १५ ते २० टक्क्यावर आले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सुधारणा होऊन कांद्याला प्रती क्विंटल कमीतकमी ७५१ रुपये जास्तीतजास्त २ हजार ६८६ रुपये तर सरासरी २ हजार २२५ रुपये इतका भाव मिळत होता.

    शेतकरी मेटाकुटीला
    कांद्याला योग्य भाव मिळत असल्याचे पाहून काही प्रमाणात अच्छे दिन आल्याचा अनुभव शेतकऱ्यांना होत असताना आता मात्र भावात मोठी घसरण सुरु झाली असून आज कांद्याला सरासरी ६५४ रुपये भाव मिळाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी प्रती किलो २१ रुपये भाव असलेला कांदा आज थेट ६ रुपये ५० पैशावर आला. भावात मोठी घसरण झाल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसून तो मेटाकुटीला आला आहे. अाम्हाला अामच्या मालाचा भाव ठरवू द्या, असे अाता बळीराजा म्हणू लागला अाहे.

    सध्या बाजारात लाल आणि रांगडा कांद्याची आवक वाढली असून, इतर राज्यात देखील कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे आवक जास्त तर मागणी कमी असल्यामुळे भावात घसरण झाली आहे.

    - रुपेश ललावणी, कांदा व्यापारी, मनमाड