मराठा क्रांती मूक आंदोलन – भुजबळ खुर्चीवर बसल्याने मराठा कार्यकर्त्यांचा झाला संताप, अखेर संभाजीराजेंनी समजूत काढल्याने प्रकरण निवळले

नाशिकचे पालकमंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना बसण्यासाठी खुर्ची देण्यावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. मराठा आंदोलकांनी भुजबळांना खुर्ची का बसण्यास दिली म्हणत विरोध करण्यात आला आणि एकच गोंधळ उडाला.

    नाशिक : नाशिकमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनाला (Maratha Kranti Andolan) सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील आमदार बोलण्यासाठी हजर आहे. पण, यावेळी नाशिकचे(Nashik) पालकमंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना बसण्यासाठी खुर्ची देण्यावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. मराठा आंदोलकांनी भुजबळांना खुर्ची का बसण्यास दिली म्हणत विरोध करण्यात आला आणि एकच गोंधळ उडाला.

    कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते, त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी संभाजीराजे स्वत: समोर आले. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना खाली बसायला अडचण आहे. त्यांना खुर्चीवर बसू द्या, ते खुर्चीवर बसले तर काहीही अडचण नाही, आपण सगळ्यांनी मन मोठे ठेवा, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडली. यावेळी खुर्चीवर का बसलो होतो, याचा खुलासाही केला.

    ‘छगन भुजबळ शत्रू आहे असा अपप्रचार केला जात आहे. आपण एकत्र येऊन लढूया. आपला लढा व्यवस्थेशी आहे, तो एका व्यक्तीविरोधात नाही. त्यामुळे चर्चेशिवाय मार्ग नाही मला पाठीचा त्रास आहे, त्यामुळे खुर्चीवर बसलो, असं भुजबळांनी सांगितलं.

    मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमत नाही. सर्व पक्षांची हीच भूमिका आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मिळायला हवं ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे. ओबीसी आक्रोश मोर्चा मराठा आरक्षण विरोधात नाही. दोघांचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं नाकारलं, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.

    कोरोनामुळे जनगणना झाली नाही आणी ओबीसी समाज कायद्याच्या कचाट्यात सापडला. दोन्ही समाजात वितुष्ट करण्याचा काहींचा प्रयत्न हा अयोग्य आहे. शाहू,फुले,आंबेडकर आमची दैवतं आहे. संभाजीराजे अत्यंत समंजस आहे. आपण न भांडता भारत सरकारला साकडं घालू, केंद्र सरकारने काही करायचं नाही अशी भूमिका घेतली आहे. कोर्टातील लढ्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची नितांत गरज आहे, असंही भुजबळांनी सांगितलं.