
उत्तर भारतातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, पशि्चम बंगाल, आंध्रप्रदेश राज्यातील कांद्याचे उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळे त्या–त्या राज्यातील कांदे हे स्थानिक बाजारपेठात कमी खर्चात उपलब्ध होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मागणी काहीशी कमी झाली आहे.
चांदवड : महाराष्ट्रासह इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने स्थानिक बाजारपेठात आवक वाढली आहे. यामुळे कांद्याच्या दरात नाही म्हटले तरी मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. येत्या जून महिन्यात कांद्याचे उत्पादन कमी होऊन कांद्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता कांदा तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. याचा फटका हा सर्वाधिक शेतकरी वर्गाला बसला आहे. मागीलवर्षीच्या लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे कांदे, द्राक्ष पिक अक्षरशः शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यावे लागले. पिक लागवडीसाठी आलेला खर्च देखील वसूल झाला नाही. यामुळे शेतकरी पूर्णतः आर्थिक संकटात सापडला होता. त्यानंतर चालू वर्षी पावसाळा चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून कांदे, टोमटो पिकांची लागवड केली होती. पीक अडीच तीन महिन्याचे झाले असताना ऑक्टोंबर २०२० मध्ये अवकाळी पाऊस आला अन् होत्याचे नव्हते करून टाकले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे होते नव्हते तेवढे वाया गेले होते. अवकाळीच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी उसणवारी, कर्ज घेऊन कांदयांची लागवड केली आहे. आज हे कांदे बाजारपेठात विक्रीसाठी शेतकरी घेऊन येत आहे. मात्र कांद्याच्या वाढलेल्या उत्पादनामुळे आवक वाढून बाजार भाव कमालीचे कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. एकीकडे केंद्र शासनाची कांदा निर्यातीबाबत असलेली धरसोडवृत्ती तर दुसरीकडे कोरोनाचे संकट या दुहेरी पेचामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव कमालीचे पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फक्त अन फक्त धोपाटणे शिल्लक राहत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा या विवंचनेत बळीराजा सापडला आहे.
पाच राज्यात कांद्याचे उत्पादन वाढले
उत्तर भारतातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, पशि्चम बंगाल, आंध्रप्रदेश राज्यातील कांद्याचे उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळे त्या–त्या राज्यातील कांदे हे स्थानिक बाजारपेठात कमी खर्चात उपलब्ध होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मागणी काहीशी कमी झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना आजारामुळे शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. तसेच गेल्या पाच – सहा महिन्यात अवकाळी पावसाने तीन चार वेळेस हजेरी लावल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे कांदे विक्रीसाठी नव्हते तेव्हा अडीच – तीन हजार रुपये प्रतिक्विंटल कांदे विकले गेले. आज कांदयाला अवघे ६०० – ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने खर्च देखील वसूल होत नाही आहे. एकीकडे नैसर्गीक संकट तर दुसरीकडे शासनाचे चुकीचे धोरण यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने कांदा पिकाबद्दल आपले धोरण स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे गाेपीनाथ भाेकनळ यांनी म्हटले अाहे.
देशभरात कांदा पिकाचे उत्पादन वाढले आहे. यामुळे कांद्याचे दर कमी झाले आहे. साधारणतः तीन चार महिने कांद्याची असलेली आवक अशीच राहण्याची शक्यता आहे. पर्यायाने कांद्याचे प्रतिक्विंटलमागे ५०० ते १००० रुपये असलेले दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. पुढील काळात कांद्याची आवक घटून कांद्याच्या दरात वाढ होऊ शकते, असे मत व्यावसाियक पारस डुंगरवाल यांनी व्यक्त केले.