मजूर मिळेना ! हार्वेस्टरसाठी अतिरिक्त पैसे ; अवकाळीच्या धास्तीने पिके काढण्याची लगबग

गेल्या आठवडाभरात वातावरणातील बदल, दिवसा ऊन, दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण व सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्याची पूर्ती धांदल उडत आहे. शेतमजूर मिळत नसल्याने गहू काढणीसाठी उत्तर भारतातून आलेल्या हाॅवेस्टर मशिनला शेतकर्‍यांची मोठी मागणी दिसून येते आहे. हाॅवेस्टरला प्रतीएकरी अडीच ते तीन हजार रुपये दराप्रमाणे चढ्या भावाने पैसे मोजावा लागत आहेत. मात्र अवघ्या काही तासातच पिके काढली जातात यामुळे हाॅवेस्टरला पंसती मिळत आहे. पिके काढणीसाठी शेतकरी सध्या नंबर लावून हाॅवेस्टरच्या मागे-मागे फिरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते आहे.

    मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यासह काही भागात गेल्या आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह होणाऱ्या बेमोसमी पावसाने व गारपीटमुळे बळीराजा धास्तावला आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिके काढणीची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे.

    रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा भाजीपाला आदी पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिके काढणीला आली असतांनाच ओली झाली तर वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले असून, मुदतीपूर्वीच पिके काढण्यासाठी शेतकर्‍यांची चढाओढ लागली आहे. त्यामुळे शेत शिवारात पिके काढण्याची शेतकरी व मजूरांची मोठी लगबग सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर सर्वत्र सुगीची गडबड असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी हरभरा सोंगणी व मळणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी शेतकरी कुटुंबासह सोंगणीसाठी कसरत करु लागले आहेत. प्रत्येकाची आपापल्या परीने शेतातील माल पावसाच्या आधी सुरक्षितपणे घरी आणण्याची गडबड दिसून येत आहे.

    गेल्या आठवडाभरात वातावरणातील बदल, दिवसा ऊन, दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण व सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्याची पूर्ती धांदल उडत आहे. शेतमजूर मिळत नसल्याने गहू काढणीसाठी उत्तर भारतातून आलेल्या हाॅवेस्टर मशिनला शेतकर्‍यांची मोठी मागणी दिसून येते आहे. हाॅवेस्टरला प्रतीएकरी अडीच ते तीन हजार रुपये दराप्रमाणे चढ्या भावाने पैसे मोजावा लागत आहेत. मात्र अवघ्या काही तासातच पिके काढली जातात यामुळे हाॅवेस्टरला पंसती मिळत आहे. पिके काढणीसाठी शेतकरी सध्या नंबर लावून हाॅवेस्टरच्या मागे-मागे फिरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते आहे.

    ऐन सुगीच्या कालावधीत रोज येणारे आभाळ व पडणाऱ्या पावसाच्या सरीमुळे चिंतेत भर पडली आहे. पीके काढणीच्या मोसमात अवकाळी पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गहू, ज्वारी, मका, आदी पिके आडवी झाली आहेत. गहू सोंगणीसाठी मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टरचा एकमेव पर्याय आहे. १८०० ते २००० रुपये प्रतीएकर मजूरी असतांना हार्वेस्टर मालक मात्र शेतकऱ्यांकडून २५०० ते ३००० प्रतीएकर असा जास्तीचा दर आकारात आहेत.

    - अभिजीत अहिरे, शेतकरी दाभाडी