मालेगाव आयुक्तांच्या अविश्वासावर शिक्कामोर्तब ;  ८० विरुद्ध ० ने मंजूर

नगरसेवक रशीद शेख यांच्या सूचनेनुसार महापौर शेख यांनी मतदान प्रक्रिया सुरु केली. पक्षीय बलाबलनुसार हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात कॉंग्रेसच्या २८, महागठबंधन आघाडी २६, शिवसेना १२, भाजप ९, तर एमआयएमच्या ५ अशा ८० नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केल्याने बहुमतात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

    मालेगाव : येथील महापालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार यांच्याविरुद्ध सत्ताधारी पक्षाने पारित केलेला अविश्वास ठराव अखेर बहुमताने मंजूर करण्यात आला. मालेगाव महापालिकेच्या इतिहासात आयुक्तांवर अविश्वासाची ही पहिलीच वेळ असून ८० विरुद्ध ० अशा मतांनी आयुक्त कासार यांच्यावर अविश्वास ठरावाच्या बाजूने सर्वपक्षीय नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केल्याने सदर ठराव मंजूर करण्यात आला.

    येथील महापालिकेच्या सभागृहात गुरुवार दि.२५ रोजी ४ वा. महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव श्याम बुरकुल यांच्या उपस्थिती ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित करण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी एमआयएम गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी प्रस्तावावर हरकत नोंदवत वादग्रस्त ठेके रद्द करण्याची मागणी करीत तशी सूचना मांडण्याची महापौर ताहेरा शेख यांच्याकडे विनंती केली. तर जनता दलाचे गटनेते मुश्तकिम डिग्नटी यांनी आयुक्त कासार यांच्या कारकिर्दीत महापालिकेचे आर्थिक नुकसान केले असून जनतेच्या व महापालिकेच्या हितासाठी राजकीय मतभेद विसरून प्रस्तावाच्या बाजूने करण्याचे आवाहन केले.

    दरम्यान, नगरसेवक रशीद शेख यांच्या सूचनेनुसार महापौर शेख यांनी मतदान प्रक्रिया सुरु केली. पक्षीय बलाबलनुसार हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात कॉंग्रेसच्या २८, महागठबंधन आघाडी २६, शिवसेना १२, भाजप ९, तर एमआयएमच्या ५ अशा ८० नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केल्याने बहुमतात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. ८३ नगरसेवक असलेल्या या महासभेत एमआयएमचे युनुस इसा, सादिया लइक हे दोघे तर सेनेचे नारायण शिंदे असे तीन नगरसेवक तब्येत बरी नसल्याने गैरहजर राहिल्याने ८० नगरसेवकांनी या मतदान प्रक्रियेत ऑनलाईन सहभाग नोंदविला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महापौर ताहेरा शेख व उपमहापौर निलेश आहेर यांनी सदर प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे सदर ठराव पाठविण्यात येणार असल्याचे सांगत सदस्यांचे आभार मानले.