कांदा असोसिएशनने खरेदी केली बंद ; नवीन परवानाधारक व्यापाऱ्यांना विरोध

  चांदवड : चांदवड कृउबात नवीन परवानाधारक व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीस प्रारंभ केला असता कांदा व्यापारी असोसिएशनने त्यास विरोध करीत सलग दुसऱ्या दिवशी ही कांदा खरेदी बंद ठेवली आहे. यामुळे कांदा विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांनी संतप्त होत बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत लिलाव बंद पाडले. यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, विलास ढोमसे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढीत व्यापाऱ्यांची मनोपॉली बंद करण्यासाठी नवीन व्यापाऱ्यांना परवाने दिले असून, जे व्यापारी कांदा लिलावात सहभागी होणार नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजवून कारवाई करणार असल्याचे आश्वासन सभापती डॉ. कुंभार्डे यांनी दिले.

  व्यापाऱ्यांचा नकार
  चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस कांदा आवकेत कमालीची वाढ झाली आहे. पर्यायाने दिवसभरात विक्रीसाठी आलेला कांदा खरेदी केला जात नाही. यामुळे रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना बाजार समितीत मुक्कामी राहण्याची वेळ येते. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत नवीन व्यापाऱ्यांना परवाने दिले आहेत. या नवीन व्यापाऱ्यांनी मंगळवार (दि. ११) सायंकाळच्या सुमारास कांदे खरेदीस सुरुवात केली. यास कांदा व्यापारी असोसिएशनने विरोध करीत कांदा खरेदी बंद केली. कांदा खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीने नोटीस काढून बुधवार (दि. १२) रोजी लिलावास उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरीदेखील कांदा असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी बुधवार (दि.१२) लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत.

  परवाने रद्द करा
  यामुळे कांदा लिलाव सुरु होतो कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. दुपारचे १२ वाजले तरी लिलाव सुरु न झाल्याने शेतकऱ्यांनी एकवटून बाजार समितीत ठिय्या दिला. यावेळी प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी जेवढे जास्त व्यापारी तेवढा शेतकऱ्यांचा फायदा आहे. मात्र जुने व्यापारी जर स्वतःची मनमर्जी करून नव्या व्यापाऱ्यांना विरोध दर्शवित असतील तर हे चुकीचे आहे. अशा विचार धारेच्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीने तत्काळ कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली.

  भाव मिळत नसल्याने संताप
  नवीन व्यापाऱ्यांनी कमी भावात कांदा खरेदी न करता इतर बाजार समितीच्या सरासरी खरेदी करण्याची मागणी केली. यावेळी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, जेष्ठ संचालक विलासराव ढोमसे, निवृत्ती घुले, संपतराव वक्ते, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, शांताराम ठाकरे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढीत कांदा लिलाव सुरु करण्याचे आवाहन केले. त्यानंतर कांदा लिलाव सुरु करण्यात आला; मात्र भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा लिलाव बंद पाडले.

  चांदवड कृऊबा समितीने परवाना दिलेल्या नवीन कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीस सुरुवात केली असता कांदा व्यापारी असोसिएशनने त्यास विरोध करीत खरेदी बंद केली आहे. व्यापाऱ्यांनी आडमुठेपणा न करता नवीन व्यापाऱ्यांना असोसिएशनमध्ये सहभागी करून घेत कांदा खरेदी सुरु करावी. जर व्यापारी कांदा खरेदी करण्यास तयार नसतील तर बाजार समिती प्रशासन योग्य ती कारवाई करेल.

  - डॉ. आत्माराम कुंभार्डे, चेअरमन, चांदवड कृउबा

  “चांदवड बाजार समिती प्रशासनाने जुने व नवीन कांदा व्यापाऱ्यांचा समन्वय करून कांदयाचे लिलाव सुरु करायला हवे होते. आज बाजार समिती हजारोंच्या संख्येने शेतकरी कांदा विक्रीस आले असताना नवीन व्यापाऱ्यापैकी फक्त एक ते दोन व्यापारी कांदा खरेदी करीत आहे. यात क्विंटल मागे जवळपास १००० रुपयांचा फरक असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हक्काची बाजारपेठ असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा.”
  – गणेश निंबाळकर, उपाध्यक्ष, प्रहार संघटना