मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा ; ओबीसी-मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न : भुजबळ

  नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा आणि माझ्या पक्षाचा नेहमीच पाठिंबा राहीला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही सर्वपक्षीय भूिमका असून माझी व माझ्या पक्षाची देखील हीच भूिमका आहे. त्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत असून मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे. सध्या काही जण ओबीसी आणि मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मूक आंदोलनप्रसंगी ते बाेलत हाेते.

  यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज मराठा आणि ओबीसी दोन्हीही समाज अडचणीत आहे, काही लोक जाणीवपूर्वक मराठा समाज व ओबीसी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमची दैवतं ही एकच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर ही आमची दैवत आहेत त्यामुळे कोणीही आमच्यात द्वेष पसरवण्याचे काम करू नये असे त्यांनी स्पष्ट केले.

  मराठा समाजाच्या आरक्षणासह ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही अतिशय महत्वाची असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. ज्या ज्या वेळेस विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित झाले त्या त्या वेळेस आम्ही पाठिंबाच दिला आहे. आज आरक्षणाचा प्रश्न हा दोन समाजातील नसून हा व्यवस्थेविरुद्ध लढा आहे आणि त्याला माझा नेहमीच पाठिंबा असेल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

  आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्रित करण्याची जी भुमिका घेतली आहे ती स्वागतार्ह आहे. सर्वांना एकत्रित करताना संभाजीराजे हे अतिशय सामंजस्याची भूमिका घेत असल्याने त्यांचेदेखील त्यांनी कौतुक केले.

  ‘भुजबळांच्या खूर्चीवरून वाद’
  आंदाेलनस्थळी दाखल झाल्यानंतर छगन भुजबळ यांच्या बैठक व्यवस्थेवरून काही काळ जोरदार गोंधळ झाला. मात्र संभाजीराजेंनी या गाेंधळात वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत केलं. संभाजीराजे यांच्यासह आंदोलक आधीच आंदोलनस्थळी जमिनीवर बसले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आंदोलनस्थळी पाेहाेचल्यानंतर त्यांना बसायला खूर्ची देण्यात आली. त्यावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले. काही वेळ जोरदार गोंधळ झाला. संभाजीराजे खाली बसले असताना भुजबळांना खुर्ची का दिली? असा आंदाेलकांचा आक्षेप हाेता. मात्र, संभाजीराजेंनी येथेही सामंजस्याची भूमिका घेऊन मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केलं. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना खाली बसायला अडचण आहे. त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसू द्या, असे आवाहन संभाजीराजेंनी केले. त्यानंतर वाद मिटला. छगन भुजबळ यांनी देखील आंदोलन स्थळी मनोगत व्यक्त करताना त्याबद्दल खुलासा केला. मला पाठीचा त्रास असल्यानं मी खुर्चीवर बसलो होतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले.