पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात आराेग्य यंत्रणेला ‘लकवा’ ; पदे रिक्त असल्याने रुग्णांचे हाल

  येवला : काेराेेनाचा आलेख दिवसेंदिवस वाढता असताना पालकमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यातील आरोग्य व्यवस्थाच अत्यवस्थ आहे. पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष घालून या आरोग्य व्यवस्थेला बुस्टरडोस देण्याची गरज आहे. अन्यथा काेराेनाचा प्रादूर्भाव वाढत रािहला तर ग्रामीण भागातील जनतेला मरणाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

  इतके पदे रिक्त

  येवला शहर व तालुका परिसरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनासह सर्वसामान्यांमध्ये आता चिंता व्यक्त केली जात आहे.कोरोनाच्या या महासंकटाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र आरोग्य विभागात तालुका वैद्यकीय अधिकारी यासारख्या महत्वाच्या पदासह अनेक पदे रिक्त असून, ही पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. येवला तालुक्यातील आरोग्य विभागासाठी १७१ पदे मंजूर असून, त्यापैकी ७२ पदे भरलेली असून ९९ पदे रिक्त आहेत. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघ यांसह दोन आमदारांचा तालुका अशी ओळख असलेल्या मतदारसंघात आरोग्य व्यवस्था मात्र मरणासन्न अवस्थेत आहे. आरोग्य व्यवस्थेत सगळ्यात महत्वाचे पद आहे. ते म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी मात्र येवला तालुक्यात गेली अनेक वर्षे हे पद रिक्त आहे. कोरोनासारख्या उद‌्भवलेल्या परिस्थितीशी सामना करतांना अपुऱ्या कर्मचार्‍यांमुळे आरोग्य विभागाची मोठी दमछाक होत आहे.

  या ठिकाणी अपुरा कर्मचारी वर्ग

  कोरोना काळात महत्वाची व मोठी जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर असतांना येवला तालुक्यातील मंजूर असणार्‍या १७१ पदांपैकी थोडी थिडकी नव्हे तर निम्म्यापेक्षा अधिक ९९ पदे आजही, रिक्तच आहे. गेल्या वर्षीही कोरोना काळात अपुर्‍या कर्मचार्‍यांचा हा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. तालुक्याला तालुका आरोग्य अधिकारी पद रिक्त असून, या पदाचा अतिरिक्त पदभार पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शरद कातकाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हे पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असून, सावरगाव, भारम, अंदरसुल येथील औषध निर्माण अधिकारी पदे रिक्त आहेत. भारम प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्त असून, सावरगाव, राजापूर येथील आरोग्य सेवक पद रिक्त आहे. देवळाणे, पिंपळगाव जलाल, जळगाव नेऊर, देशमाने, एरंडगाव, निमगाव मढ, भारम उपकेंद्र, ममदापूर, पिंपरी येथील आरोग्य सेवकांची २१ तर अंदरसूल, सावरगाव, भारम, पाटोदा, राजापूर येथील ५ आरोग्य सहाय्यकांची पदे रिक्त आहेत. ६१ पैकी पाटोदा, कातरणी, विखरणी, पाटोदा ओपीडी, मुखेड ओपीडी, मुखेड उपकेंद्र, चिचोंडी, निमागव मढ, एरंडगाव, पिंपळगाव जलाल, सायगाव, देवळाणे, अंदरसुल उपकेंद्र, सावरगाव उपकेंद्र, कुसूर, राजापूर, ममदापूर, देवठाण, भुलेगाव या ४८ ठिकाणी आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत. ७ पैकी मुखेड, सावरगाव, भारम, राजूपर या ४ ठिकाणची कनिष्ठ सहाय्यक पदे रिक्त आहेत. २७ पैकी पाटोदा, मुखेड, अंदरसुल, सावरगाव येथील प्रत्येकी २ व भारम येथील ३ परिचर पदे रिक्त आहेत.

  इमारती धूळखात पडून

  विशेष म्हणजे आरोग्य विभागातील एव्हढी पदे रिक्त असतांनाही आरोग्य विभाग आहे त्या कर्मचार्‍यांवर दैनंदिन कामकाजासह कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तारेवरची कसरतच करत आहे. येवला तालुक्यामध्ये आरोग्य विभागाने इमारती उभ्या केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र राजापूर भारम तसेच उपकेंद्र देवठाण एरंडगाव निमगाव मढ भुलेगाव या केंद्राला तात्काळ डॉक्टर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आरोग्य केंद्रांचे उद्घाटन करून पाच वर्षे उलटून गेली आहेत. मात्र कर्मचारी नसल्याने कोटी रुपयाच्या इमारती धूळ खात पडलेल्या आहेत. याकरता जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

  कोरोना हॉटस्पॉट

  येवला शहरातील विठ्ठलनगर, पटेल कॉलनी, बाजीराव नगर, हुडको, श्रीराम कॉलनी, मित्रविहार र्कालनी, काळामारूती रोड, पारेगाव रोड, बुंदेलपुरा हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. तर ग्रामीण भागातील धुळगाव, लौकी, सावरगाव, चिचोंडी खुर्द व नगरसुल हे हॉटस्पॉट ठरले आहेत.

  लसीकरण

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत आरोग्य ३१८, पोलिस १००, पिआरसी १८१, महसुल ८६, ६० वर्षावरील १ हजार पेक्षा जास्त, कोमॉरबीड १० हजार पेक्षा जास्त व्यक्तींना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.

  उपाययोजना
  १.येवला शहरातील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. नगरपालिका, उपजिल्हा रूग्णालय, पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्ण तेथे तपासणी मोहीम राबविली जात आहे.
  २. शहरातील उपजिल्हा रूग्णालयात सर्वच व्यवसायीकांसह संशयीतांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहे. तर ग्रामीण भागातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांवरही संशयीतांच्या चाचण्या केल्या जात आहे.
  ३. अंशत: लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका, पोलिस व महसूल प्रशासनाकडून नियम मोडणार्‍यांविरूध्द दंडात्मक कारवाई केली जात आहे. ग्रामीण भागात गाव पातळीवर ग्रामपंचायत प्रशासनही संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत.

  येवला तालुक्यातील आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागा तात्काळ भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे त्यामुळे कंत्राटी का होईना ही पदे तात्काळ भरली पाहिजे यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः लक्ष घालून प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा

  प्रवीण गायकवाड ; सभापती पंचायत समिती येवला