कोनशिलेवर खासदारांच्या नावाचा प्रशासनाला विसर ; भाजपच्यावतीने निषेध

ममदापूर संवर्धन राखीव पर्यटन निवास व्यवस्थेच्या इमारतीच्या कोनशिलेवर शिष्टाचारानुसार दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांचे नाव असणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाकडून नाव टाकण्यात आले नसल्याने येवला भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येऊन तात्काळ कोनशिलेवर नाव टाकण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.

    येवला :  तालुक्यातील देवदरी येथे वनविभागाच्या वतीने संवर्धन राखीव पर्यटन निवास व्यवस्थेचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. राजापूर, ममदापूर वनविभाग परिसरात भटकंती साठी आलेल्या पर्यटकांची तात्पुरत्या निवासाची सोय व्हावी, या उद्देशाने पर्यटन निवास व्यवस्था इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यात आले असून, इमारत उद्घाटनासाठी लावण्यात आलेल्या कोनशिलेवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ. भारतीताई पवार यांच्या नावाचा प्रशासनाला विसर पडल्याने भाजपच्या वतीने निषेध नोंदविण्यात येऊन नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

    आंदोलन छेडणार
    निवेदनात म्हटले आले आहे की, तालुक्यातील ममदापूर संवर्धन राखीव पर्यटन निवास व्यवस्थेच्या इमारतीच्या कोनशिलेवर शिष्टाचारानुसार दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांचे नाव असणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाकडून नाव टाकण्यात आले नसल्याने येवला भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येऊन तात्काळ कोनशिलेवर नाव टाकण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.

    यांची उपस्थिती
    यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर शिंदे, तालुका उपाध्यक्ष संजय जाधव, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष जगदीश पटेल, राजू परदेशी, दत्ता सानप, बाळासाहेब साताळकर, छगन दिवटे, संतोष केंद्रे, गणेश गायकवाड, शिवाजी शेळके, शांताराम पवार, लक्ष्मण कदम, गंगाधर भंडारे, संजय पाठे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.