वाडीव-हे परिसरात लोखंडी सळ्या चोरीचे रॅकेट ; पोलिसांचा वरदहस्त असण्याची शक्यता

वाडीव-हे परीसरातील सरबजित धाब्याजवळ हा अवैध गोरखधंदा सुरु असून या गोरखधंद्यातून रोज लाखोंची उलाढाल होत आहे. ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी हा अवैध धंदा बंद करावा, अशी मागणी पंचक्रोशितुन होत आहे.

  इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावर स्टीलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. कारखान्यातून भरून निघालेल्या ट्रेलरमधून लोखंडी सळ्या चालकाच्या संमतीने परस्पर उतरवत अल्पदरात विकल्या जात असल्याची चर्चा वाडीव-हे परिसरात सुरु आहे. महामार्गावर वाहतुकीस खोळंबा होत असला तरी पोलिसांकडून या अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

  पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालावे
  वाडीव-हे परीसरातील सरबजित धाब्याजवळ हा अवैध गोरखधंदा सुरु असून या गोरखधंद्यातून रोज लाखोंची उलाढाल होत आहे. ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी हा अवैध धंदा बंद करावा, अशी मागणी पंचक्रोशितुन होत आहे. पोलीस अधिक्षक पाटील यांनी अवैध धंदे चालकांना एकीकडे पळती भुई करून सोडले असतांना वाडीव-हे परीसरात स्टील चोरीचा नवीन फंडा सुरु झाला आहे.

  असे आहे रॅकेट
  ट्रेलर चालकाच्या संमतीने स्टीलची विक्री अल्पदरात करून लाखोची माया दररोज कमवली जात आहे. पेट्रोल पंप, ढाबा, खडी क्रेशर समोर या तीन ठीकाणी स्टील वाहतुक करणाऱ्या अनेक ट्रेलरमधुन चोवीस तासात शेकडो टन लोखंडी सळ्या राजरोसपणे ओढुन काढुन उतरवल्या जात आहेत. चोरीच्या उतरवलेल्या या लोखंडी सळ्या नंतर नाशिक मधील अंबड लिंकरोड येथील दुकानात चढ्या दराने विक्री केली जाते. स्टीलचे गगनाला भिडलेले भाव आणि वाहतुकीत चालकांकडुन होत असलेली चोरी याचा फटका स्टील उत्पादन कंपन्यांनाही बसत आहे. या अवैधधंदे चालकांच्या उद्योगामुळे स्थानिक राहणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकुणच नव्याने सुरु झालेल्या अवैध धंद्याना ग्रामीण पोलीसांनी वेळीच रोखण्याची मागणी होत आहे.
  दोन दशकापुर्वी महामार्गावरील अवैध धंदे पोलीसांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरले होते. पेट्रोल भेसळ प्रकरणात थेट गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. तर पेट्रोल चोरीत कंटेनरच्या टाकीत उतरलेल्या चालकांना आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे ग्रामीण पोलीस दल चर्चेत आले होते. अवैध धद्यांना पोलीसांचाच वरदहस्त असल्याचे बोलले गेल्याने अनेकांना उचलबांगडीस सामोरे जावे लागले होते. कालांतराने महामार्गावरील प्रमुख बाजारपेठा वगळता अवैध धंदे बंद करण्यात पोलीसांना यश आले होते.