येवल्यातील तीन दुकाने सील ; तहसीलदार प्रमोद हिले यांची कारवाई

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

    येवला : येवला शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून प्रशासनाने अनेकदा सूचना करूनही व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत असल्याने अखेर प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी येवला शहरातील ३ दुकाने ३१ मार्च पर्यत सील केली आहेत
    तहसिलदार प्रमोद हिले हे आज बुधवारी महसूल विभागाच्या पथकासह रस्त्यावर उतरल्याने नियमांची पायमल्ली करणाऱ्या दुकानदारांची धावपळ उडाल्याचे दिसून आले कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर त्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे महसूल पथकासमवेत शहरातील कापड बाजार, विंचूर चौफुली परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीची तपासणी केली. यावेळी जब्रेश्वर खुंट येथील पुष्कराज ज्वेलर्स हे सराफी दुकान, बाजारपेठेतील अथर्व गिफ्ट तर विंचूर चौफुली येथील न्यू तृप्ती फरसाण ह्या दुकानामध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने दुकान तत्काळ सीलबंद करण्यात आले.ही कारवाई स्वतः तहसिलदार हिले तसेच येवला शहर पोलीस निरीक्षक संदिप कोळी, तलाठी संतोष आठवले, पांडुरंग कोळी, शिपाई अनिल नाईक यांनी केली.वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रांताधिकारी सोपान कासार यांनी शहर व परिसरातील हॉटेल चालकांवर दंडात्मक कारवाई केली असून यापुढेही गर्दी होणाऱ्या दुकानात मास्क न वापरणाऱ्या व सामाजिक अंतराचे पालन न करणारी व्यावसायिक आस्थापने दुकाने तत्काळ सीलबंद करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांनी व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन तहसिलदार हिले यांनी केले आहे.