धक्कादायक घटना! नाशिकमधील एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर कात्रीने प्राणघातक हल्ला

    नाशिक येथे एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर कात्रीने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांबाबत सातत्याने येत असलेल्या तक्रारीवरुन जाब विचारल्याने वॉर्डबॉयने हे कृत्य केल्याचे समजते. या घटनेनंतर सुकदेव नामदेव आव्हाड यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत संशयित वॉर्डबॉय अनिकेत डोंगरे याला अटक करण्यात आली आहे.

    वॉर्डबॉय अनिकेत डोंगरे याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात डॉ. सोनल अविनाश दराडे गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर घटना गंगापूर रोडवर असलेल्या एका नामांकित रुग्णालयात घडली. या रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सातत्याने विविध तक्रारी रुग्णालय व्यवस्थापनाकडे येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत डॉ. सोनल दराडे यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या वेळी अनिकेत डोंगेर यांने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

    डॉ. सोनल दराडे यांच्यावर केलेला हल्ला इतका गंभीर झाल्या होत्या की, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचार करावे लागले. डॉक्टरांनी विचारलेल्या जाबाचा राग मनात धरुन डोंगरे याने डॉ. दराडे यांच्या केबीनमध्ये प्रवेश केला. त्याने डॉक्टरांवर पाठिमागून मानेवर कात्रीने वार केला. त्यानंतर त्याने तीच कात्री पोटात उजव्या बाजूला खुपसली. त्यामुळे डॉ. सोनल गंभीर जखमी झाल्या. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन वैद्यकीय उपचार करावे लागले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.