sahitya sammelan

साहित्य संमेलनाच्या(Sahitya Sammelan) आयोजनाचा खर्च मोठा आहे. त्यामुळे आमदारांनी विशेष बाब म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये द्यावेत, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले होते.

    नाशिकः नाशिक(nashik) येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची(Sahitya Sammelan) तयारी सुरु झाली आहे. या संमेलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांच्यासह ६ आमदार ५५ लाख रुपये देणार आहेत. याविषयीचे संमतीपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन विभागाने दिली. त्यामुळे हे संमेलन एकदम जंगी होणार यात शंका नाही.

    नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस, आडगाव येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ डिसेंबर या तारखांना होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या एक दिवस आधी गुरुवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता संमेलनस्थळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ४ डिसेंबर रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे.

    साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा खर्च मोठा आहे. त्यामुळे आमदारांनी विशेष बाब म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये द्यावेत, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, सटाण्याचे आमदार डॉ. दिलीप बोरसे यांनी दहा लाखांचा निधी देण्याचे संमतीपत्र जिल्हा नियोजन विभागास दिले आहे. सर्व आमदारांची पत्रे मिळाल्यानंतर एकत्रित प्रस्ताव मंत्रालयातील नियोजन विभागाला देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी दिली.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांचे वैशिष्ट्यपूर्ण असे कलाप्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. सोबतच कुसुमाग्रजनगरीमध्ये सर्व रसिक नागरिकांच्या माहितीसाठी नाशिकच्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शनही भरवले जाणार आहे. नाशिक जिल्हा स्थापनेला १५० वर्ष झाली आहेत. या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. एकंदर साहित्य संमेलन रसिकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरणार आहे.