खासगी चालकाच्या हाती स्टेरींग ; कर्मचाऱ्यांमध्ये संताप

मालेगाव आगारात एकूण ४१ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यात ३ वाहन चालक, ३ वाहक, २८ प्रशासन कर्मचारी तर ८ यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मालेगाव आगारातून नाशिक बस सेवा सुरू करण्यात आली आहेच.

  मालेगाव : विलीनीकरणाच्या मागणीसाठी, एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून संप सुरू असताना एसटी प्रशासनानं नाशिक विभागात चक्क खासगी चालकांची नेमणूक करत बस चालवायला दिली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप मालेगाव येथील संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

  ‘या’ मार्गावर धावल्या बस
  नाशिक विभागात काही खासगी बस चालकांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक-मालेगाव, नाशिक-धुळे या मार्गावर या बस धावणार असून बुधवारी नाशिक येथून मालेगाव तर मालेगाव येथून नाशिक असा विना वाहक प्रवास या बसने केला. सदर बस खासगी वाहन चालकाच्या हाती दिल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

  कर्मचाऱ्यांचा आराेप
  विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत, कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. वारंवार इशारा देऊनही जे कर्मचारी कामावर येत नाहीत, त्यांच्यावर आता एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. अशातच खासगी वाहन चालकांची नेमणूक करत बस सुरू करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे. प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप मालेगाव येथील एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी केला.

  ‘इतके’ कर्मचारी झाले रुजू
  मालेगाव आगारात एकूण ४१ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यात ३ वाहन चालक, ३ वाहक, २८ प्रशासन कर्मचारी तर ८ यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मालेगाव आगारातून नाशिक बस सेवा सुरू करण्यात आली आहेच. आता मात्र नाशिक येथून देखील खासगी वाहन चालकांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून बस सुरू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

  एका दिवसाचे प्रशिक्षण घेतलेल्या खासगी वाहन चालकाच्या भरवशावर प्रवास करणाऱ्या प्रवासींचा शासनाने ५० लाखांचा विमा काढावा अथवा एसटीचे विलीनीकरण करून संप मिटवावा.

  - सचिन पोळ, प्रवाशी मालेगाव