नंदुरबार शहरात १३ तासांची कडक संचारबंदी; जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश

नाशिक विभागातील इतर जिल्ह्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यातील नंदुरबार,नवापूर, शहादा, तळोदा नगरपालिका क्षेत्रात, अक्राणी नगरपंचायत, अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात 11 मार्चपासून सायंकाळी 7 ते सकाळी 6 या कालावधीत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

    नंदुरबार (Nandurbar).  नाशिक विभागातील इतर जिल्ह्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यातील नंदुरबार,नवापूर, शहादा, तळोदा नगरपालिका क्षेत्रात, अक्राणी नगरपंचायत, अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात 11 मार्चपासून सायंकाळी 7 ते सकाळी 6 या कालावधीत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

    डॉ. भारुड म्हणाले, ही संचारबंदी ग्रामीण भागात लागू राहणार नाही, ग्रामीण भागात यापूर्वी पारीत केलेले आदेश कायम राहतील. संचारबंदी दरम्यान रुग्णालये आणि औषधाची दुकाने, दुध व वृत्तपत्रे वितरण वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील. या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरू राहील. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. संचारबंदी कालावधीत बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद राहतील. नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्याची मुभा नसेल.

    मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी. नंदुरबार शहरात 10 दिवसात 20 हजार ॲन्टिजन चाचणी करण्यात याव्यात. दुकानदार, लहान व्यावसायिक, विक्रेते, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, कर्मचारी, मजूर, फेरीवाले, एस.टी बसचे वाहक व चालक, रिक्षाचालक, सर्व प्रकारच्या खाजगी व शासकीय प्रवासी वाहतूक, यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.