‘भारत बंद’ला पाठिंबा; मात्र बाजारसमिती राहणार सुरू :पिंगळे

बाजार समिती बंद ठेवली तर त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 'भारत बंद' आंदोलनास पाठिंबा जाहीर करून बाजार समिती सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पिंगळे यांनी म्हटले आहे

    पंचवटी : शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून बहुजन शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाठिंबा अवश्य राहील, मात्र त्यादिवशी बाजार समिती बंद ठेवता येणार नाही, असे स्पष्टीकरण सभापती देवीदास पिंगळे यांनी दिले आहे.

    केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांना विरोध म्हणून गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असून, ते रद्द करून देशात आधारभूत किमतीचा कायदा करण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या तरतुदीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा, या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी (ता.२६)भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकमधील बहुजन शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र दिले आहे. समित्या बंद ठेऊन सर्वांनी ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या संघटनेने केले असून, सभापती देवीदास पिंगळे यांनाही त्यांनी निवेदन देत बाजार समितो बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
    तथापि, सभापती पिंगळे यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असला तरी सध्याच्या परिस्थितीत बाजार समिती बंद ठेवणे शेतकरी हिताचे नसल्याचे म्हटले आहे. कोरोनासारख्या महामारीने आधीच होरपळलेला शेतकरी अवकाळी, गारपीट या संकटांनाही तोंड देत आहे. हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. कर्जाच्या ओझ्याने शेतकरी दबला गेला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला शेतमाल घेऊन चार पैसे मिळतील, या आशेने शेतकरी बाजार समितीत येत असतात. मात्र अशातच बाजार समिती बंद ठेवली तर त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘भारत बंद’ आंदोलनास पाठिंबा जाहीर करून बाजार समिती सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पिंगळे यांनी म्हटले आहे.