नागरिकांचा उत्साह शिगेला, रहाडीजवळ गर्दी

दोन वर्षांनंतर रंगपंचमी साजरी होत असल्याने आज सकाळपासून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकानी रहाडी जवळ गर्दी केली. रहाडींच्या आनंद घेण्यासाठी शहरातील विविध ठिकाणच्या रहाडींवर नाशिककरांनी तुफान गर्दी केली असून नाशिककरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

    निलेश अलई, नाशिक :  दोन वर्षांनंतर रंगपंचमी साजरी होत असल्याने आज सकाळपासून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकानी रहाडी जवळ गर्दी केली. रहाडींच्या आनंद घेण्यासाठी शहरातील विविध ठिकाणच्या रहाडींवर नाशिककरांनी तुफान गर्दी केली असून नाशिककरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.रहाडीचे विधिवत पूजन झाले असून नाशिककर या राहाडीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. रहाडीपाशी तरुण-तरुणी आणि महिलांनी देखील गर्दी केली आहे.

    संपूर्ण कुटुंबातील सदस्य रंगपंचमी साजरी करण्यासाठी गंगेवरील परिसरात आल्याचे चित्र आहे. रोकडोबा मंदिराच्या परिसरात ढोल ताशांवर नागरिकांनी ठेका धरला आहे.लहान मुलेदेखील राहाडीत उड्या मारत असल्याचे दिसून येते. दरम्यान, याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राहाडीच्या आयोजकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. साधारणपणे २५ ते ३० कार्यकर्त्यांचे कडे रहाडीभोवती तैनात करण्यात आले.

    नाशिकची प्रसिद्ध रहाड

    सुमारे वीस ते पंचवीस फूट लांब व रूंद आणि दहा ते बारा फूट खोल असलेल्या दगडी बांधकाम केलेल्या हौदाला रहाड म्हणतात. या रहाडीची विधीवत पूजा करून त्यात रंग बनवले जातात. काठोकाठ भरलेल्या या रहाडीत उड़ी मारून रंगपंचमी खेळल्यास शारीरिक व्याधी दूर होतात, अशी अख्यायिका आहे. रंगपंचमीच्या दिवशी नाशकात हाडीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्याची खूप जुनी परंपरा आहे. शनि चौक, तिवंध्यातील बुधा हलवाई जवळची, जुन्या तांबट लेनमधील, गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा आणि काजीपुरा, दंडे हनुमान येथे रहाडी आहेत. नाशिकचा चेहरामोहरा बदलला असला तरी रहाडींमध्ये रंग खेळण्याची परंपरा नाशिककरांनी अद्यापही जपली आहे.शहरातील रहाडी वेगवेगळ्या रंगाच्या असतात. त्यांचा हा रंग पूर्वीपासून ठरलेला आहे. यावर्षी तरुणांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. पंचवटीतील शनी चौकात असलेल्या रहाडीचा रंग गुलाबी असून, पूजेचा मान सरदार रास्ते आखाडा तालिम संधाकडे आहे. गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या रहाडीचा रंग पिवळा असून, या रहाडीच्या पूजेचा मान सोमनाथ वासुदेव बेळे यांच्याकडे आहे.