संमेलनात पुस्तक प्रकाशनासाठी शुल्क नाही ; अर्ज नाेंदणी करण्याचे आयाेजकांचे आवाहन

ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या सारस्वतांचा यथोचित सन्मानदेखील करणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यक्रम समन्वयक समीर भुजबळ, संयोजन समन्वयक विश्वास ठाकूर, कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे आदींनी दिली आहे.

    नाशिक : नाशिकमध्ये येत्या ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्यासाठी नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अर्जामध्ये संबंधित लेखक व प्रकाशकांची प्राथमिक माहिती आणि पुस्तकाबद्दल महत्त्वाचे तपशील विचारण्यात आलेले आहेत.

    सारस्वतांचा हाेणार सन्मान
    याव्यतिरिक्त संबंधित लेखकाकडून एक हमीपत्रही भरून घेतले जाणार आहे. ज्यामध्ये कॉपीराइट, प्रकाशनासंदर्भातील तांत्रिक बाबी आणि कोव्हिड- २०१९ संदर्भातील दक्षता यासंबंधीची हमी आहे. इतरत्र पुस्तक प्रकाशनांवर होणारा खर्च टाळण्याच्या दृष्टीने संयोजक याठिकाणी पुस्तक प्रकाशन मंचाची उभारणी करणार आहेत. तिथे प्रकाशनाकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याठिकाणी ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या सारस्वतांचा यथोचित सन्मानदेखील करणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यक्रम समन्वयक समीर भुजबळ, संयोजन समन्वयक विश्वास ठाकूर, कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे आदींनी दिली आहे.

    यांचे आवाहन
    संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक- मान्यवर विचारवंतांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन ही एक संधी असून येथे उपलब्ध सोयी- सुविधांचा उपयोग करून घेत अधिकाधिक साहित्यिकांनी आपली पुस्तके प्रकाशित करण्याचे आवाहन ग्रंथ प्रकाशन समिती प्रमुख सुभाष सबनीस, उपप्रमुख प्रविण जोंधळे, विजयकुमार मिठे, प्रकाश कोल्हे यांनी केले.

    येथे साधावा संपर्क
    नावनोंदणी प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी, सुभाष सबनीस (९८८१२४८४२९), प्रशांत कापसे (९५४५४१५६७७), प्रवीण जोंधळे (९९२२९४६६२२), अलका कोठावदे (९४२०६५१९११), प्रा. लक्ष्मीकांत भट (९२२६१५७०४०), रवींद्र रनाळकर (९४०३७ ७४५६२), सुकदेव डेरे (९८२२८ ५११७९), कौस्तुभ मेहता (९२२५१ १४२१२) आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.