खरीप हंगामासाठी पीककर्ज व शेतीचे लिलाव थांबावेत यासाठी आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटना व भाजपाचे बैल व नांगर घेऊन आंदोलन…!

यावेळी बॅकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली तसेच सहकार मंत्री यांच्याशी फोन वरुन संपर्क करण्यात आला, परंतु त्यांच्याकडुनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल

    नाशिक: रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे म्हणून बैल व नांगर घेऊन निदर्शने करण्यात आली. राज्यामध्ये खरीप हंगाम संपत आला तरी राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप ३० टक्के पेक्षा जास्त झालेले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे.

    नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेमध्ये अनेक गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाल्यामुळे बँकेचे दैनंदीन व्यवहार बंद पडले आहेत. त्यातच या बँकने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, ट्रक्टर वाहनांचे लिलाव काढले आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय दुर करण्यासाठी सदर लिलाव त्वरित बंद करावेत, शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची पुर्नबांधणी करावी, शेतक-यांना त्वरित नव्याने कर्जवाटप करावे, शेतकऱ्यांच्या सेविंग खात्यातील ठेवी आहेत त्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग कराव्यात, अशा विविध मागण्या करत जिल्हा बॅकेसमोर शेतकरी नेते तथा माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेने व भाजपाने आंदोलन केले. यावेळी बॅकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली तसेच सहकार मंत्री यांच्याशी फोन वरुन संपर्क करण्यात आला, परंतु त्यांच्याकडुनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल, असे प्रशासनाला सांगण्यात आले.

    यावेळी माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत, भाजपा खासदार डाॅ. भारतीताई पवार, आमदार देवयानीताई फरांदे, आ. अॅड. राहुल ढिकले, आ. सिमाताई हिरे, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, रयचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिपकबापु पगार, रयतचे प्रवक्ते भानुदास शिंदे, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे व जिल्ह्यातील शेतकरी वर्ग उपस्थित होते.