“माझी बदनामी का?” आर्थिक व राजकीय हितांचे काम न केल्याने आरोप : आयुक्त कासार

आरोग्याच्या कामासाठी मला वैद्यकीय रजेची आवश्यकता आहे. त्यासाठी मी शासनाकडून रजा मंजूर करून घेतली होती. मात्र शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव व आयुक्तपदाचा कार्यभार घेणेस इतर कोणताही अधिकारी तयार होत नसल्याने मी शहराप्रती असलेल्या जबाबदारीतून आयुक्त म्हणून काम करत आहे. आपण सर्वांनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविरूध्द लढण्यास प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त कासार यांनी केले.

  मालेगाव : महासभा व स्थायी समितीने मंजूर केलेल्या ठेक्यांबाबत माझी बदनामी करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सदस्यांनी वादग्रस्त ठेके नको असतील तर महासभेने धोरणात्मक निर्णय घ्यावा, ही सर्व कामे आहे त्या स्थितीत थांबविण्यासाठी मी त्वरित कारवाई करण्यास तयार असल्याचे मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी सांगितले.

  अविश्वास प्रस्तावावर आयुक्त कासार यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आयुक्त कासार यांनी, गिरणा पंम्पिंग व सौर ऊर्जा प्रकल्प हे महापालिका हिताचे नसल्याने त्याची वर्क ऑर्डर सुद्धा काढली नसल्याचे सांगितले. यामुळे काही व्यक्तींचे त्यांच्या आर्थिक अथवा राजकीय हिताचे काम प्रशासनास करता आले नाही तर वेगळ्या स्वरूपाचे आरोप त्यांच्याकडून होत असतात. मी स्वतः माझी बदली करण्यास शासनाकडे विनंती केली असून उगाच माझ्यावर खोटे आरोप करू नये, असे आयुक्त यांनी सांगितले.
  मालेगाव महापालिकेचा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मालेगावातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा व रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मनापासुन अहोरात्र काम केले. त्या काळात मालेगाव शहरातील धार्मिक व स्वयंसेवी संस्थांनी खूपच छान साथ दिली व एक यशस्वी “मालेगाव पॅटर्न” तयार झाला.

  मागील आठ ते दहा दिवसापासून मालेगाव शहराच्या सोशल मीडियात माझ्याबद्दल खुपच बदनामी चालू आहे. माझ्यावर आग्रारोड, बायोमायनिंग, स्वच्छता कामाचे आऊटसोर्सिंग, घरपट्टी सर्व्हे, सौर ऊर्जा प्रकल्प, गिरणा पंपिंग मशिनरी दुरुस्ती ही कामे मी महापालिकेचे आर्थिक नुकसान करण्यासाठी तयार केली असे आरोप काही लोकप्रतिनिधींनी माझ्यावर केले आहेत. मात्र यातील बहुसंख्य कामांचे डॉकेट किंवा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे पाठविलेला नाही तर तो महासभेच्या सदस्यांच्या सूचनेनुसार तयार केलेला आहे व तो ठराव अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठविलेला आहे. काही ठरावात तर टेंडरच्या अटी-शर्ती सुद्धा नमूद केलेल्या आहेत.

  या ठरावानुसार प्रशासनाने निविदा मागविलेल्या आहेत व आलेल्या न्युनतम दरात सुद्धा प्रशासनाने वाटाघाटी केलेली आहे. व त्यानुसार कमी केलेले दर स्थायी समीतीकडे मान्यतेसाठी पाठविलेले आहेत. समितीने चर्चा करून मान्यता दिलेल्या कामांचीच फक्त वर्क ऑर्डर दिलेली आहे. यातील कोणत्याही कामाला अद्याप पाहतो एक रुपये अग्रिम दिलेला नाही. गिरणा पंपिंग मशिनरी दुरुस्ती व २७.४० कोटीचा सौरऊर्जा प्रकल्प मला महापालिकेच्या आर्थिक हिताविरुद्ध वाटत असल्याने या कामाची मी वर्क ऑर्डर दिली नाही, तसेच मान्यतेसाठी सदर प्रस्ताव स्थायी समितीकडे हि पाठविले नसल्याचे आयुक्त कासार यांनी आरोपांना उत्तर देताना सांगितले.

  माझ्यावर आरोप करण्यात आलेली सर्व कामे ही महासभेच्या ठराव नुसारच मंजूर झालेली आहे. जर महासभेला ही कामे आता नको असतील तर महासभेने धोरणात्मक निर्णय घ्यावा, ही सर्व कामे आहे त्या स्थितीत थांबविण्यासाठी मी त्वरित कारवाई करण्यास तयार असल्याचे आयुक्त कासार यांनी यावेळी सांगितले.
  कोरोना काळात मनपा प्रशासनाने अहोरात्र काम करून रुग्णांची सेवा केली आहे. चुकीच्या पद्धतीने मला अथवा प्रशासनाला कोणत्याही कामासाठी दबाव टाकण्यासाठी बदनाम करु नये, अशी विनंती आयुक्त कासार यांनी यावेळी केली.

  आरोग्याच्या कामासाठी मला वैद्यकीय रजेची आवश्यकता आहे. त्यासाठी मी शासनाकडून रजा मंजूर करून घेतली होती. मात्र शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव व आयुक्तपदाचा कार्यभार घेणेस इतर कोणताही अधिकारी तयार होत नसल्याने मी शहराप्रती असलेल्या जबाबदारीतून आयुक्त म्हणून काम करत आहे. आपण सर्वांनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविरूध्द लढण्यास प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त कासार यांनी केले.