पुणे जिल्हा परिषदेकडून खेड पंचायत समितीचा गौरव; सलग पाच वर्षे घरकुल योजनेत खेड तालुका पहिला

राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान ग्रामीण २०२१-२२ राबविण्यात येत आहे. सलग पाच वर्षे घरकुल योजनेत खेड तालुका पहिला आहे.

  खेड : भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद पुणे महाआवास अभियानाच्या ‘ग्रामीण ७५ दिवस कार्यक्रमां’तर्गत खेड तालुक्यात ४२९ प्रस्तावांपैकी पैकी ३८९ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी १६ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

  राज्य शासनाच्या २०२२ पर्यंत सर्वांसाठी आवास’ या योजनेच्या ७५ दिवस कार्यक्रम २१ मार्च २०२२ ते ३१ मे २०२२ पर्यंत खेड तालुक्यात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नागरिकांच्या अपूर्ण घरकुलाचे बांधकाम ७५ दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. खेड तालुक्यात २०१६ ते २०२२ या कालावधीत मागासवर्गीय, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या गरीब अशा २४९९ कुटुंबांना शबरी, रमाई आणि प्रधानमंत्री घरकुल योजनांचा लाभ देण्यात आला असून, १६३८ पेक्षा जास्त घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तालुक्यात ८६१ घरकुले बांधकाम प्रगतिपथावर आहे. तर सुमारे ४९ घरकुले तांत्रिक बाबींमुळे रद्द करण्यात आली आहेत. विस्तार अधिकारी अनिता ससाणे गणेश काळे, अविनाश भोकटे यांच्या माध्यमातून घरकुलाच्या लाभार्थींना मार्गदर्शन केले जात आहे.

  खेड पंचायत समितीचा गौरव

  राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान ग्रामीण २०२१-२२ राबविण्यात येत आहे. सलग पाच वर्षे घरकुल योजनेत खेड तालुका पहिला आहे. यंदाही योजनेत जिल्ह्यात खेड तालुका पुढे असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खेड पंचायत समितीचा गौरव करण्यात आला आहे.

  घरकुलासाठी सव्वा लाखांचे अनुदान

  एका घरकुलाला १ लाख २० हजार रुपये शासनाकडून अनुदान मिळते शिवाय मजुरी म्हणून २३ हजार ४० रुपये दिले जाते.

  तांत्रिक अडचणींमुळे कामे संथगतीने

  खेड तालुक्यात ‘७५ दिवस कार्यक्रमांतर्गत घरकुलाच्या कामांना वेग आला असताना घरकुलासाठी हप्ते काढण्याला टेक्निकल अडचणी येत असल्याने वेळेत हप्ते निघत नाहीत. तसेच टेक्निकल अडचणी येत असल्याने कामांची गती मंदावली आहे. प्रशासनाकडून या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  अजय जोशी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती.

  खेड तालुक्यात पंतप्रधान, शबरी रमाई घरकुल योजनेसाठी गावागावात लाभार्थीचे मेळावे घेतले. ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, सरपंच, सदस्य यांच्या बैठका घेऊन कागदपत्रांची पूर्तता केली. घरकुल दत्तक पालकाच्या माध्यमातून घरकुलविषयक मार्गदर्शन केले जात आहे. अडीअडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढला जात आहे. तसेच गरजूंसाठी सामाजिक दायित्व निधीतून रासे-भोसे येथे ५५ घरकुले बांधली जात आहेत. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात खेड तालुका प्रथम राहील, असे काम योजने अंतर्गत केले जाणार आहे.

  अनिता ससाणे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती.

  ७५ दिवस कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातून ७२७९ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने ते मंजूर होणार आहे. जिल्ह्यात या योजनेत खेड तालुका प्रथम आहे. नव्याने आदिम जमाती आवास योजनेतंर्गत ८ घरकुलाना आदिवासी विभागाकडून मंजुरी मिळाली आहे.