खोडजाईवाडी गाव बनले स्मार्ट व्हिलेज! संपूर्ण गावात ४० सोलर लँप, गाव स्वयंपूर्ण प्रकाशमय

मसूरच्या पुर्वेस गिरजाशंकर डोंगराच्या कुशीत  वसलेल्या खोडजाईवाडी, ता. कराड या गावची स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल सुरू आहे. माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष संगिता साळुंखे, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक विश्वनाथ पवार पवार यांच्या सहकार्याने गाव आता प्रकाशने स्वयंपूर्ण झाले आहे.

  बाळकृष्ण गुरव, मसूर : मसूरच्या पुर्वेस गिरजाशंकर डोंगराच्या कुशीत  वसलेल्या खोडजाईवाडी, ता. कराड या गावची स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल सुरू आहे. माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष संगिता साळुंखे, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक विश्वनाथ पवार पवार यांच्या सहकार्याने गाव आता प्रकाशने स्वयंपूर्ण झाले आहे. खोडजाईवाडीने आपले संपूर्ण गावात ४० सोलर लँप बसवून गाव विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

  खोडजाईवाडी गाव स्वयंपूर्ण प्रकाशमय व्हावे म्हणून गावातील सर्वच रस्त्यावर तसेच अडचणीच्या ठिकाणी जवळपास ४० सोलर लँप बसवण्यात आले आहेत. कराड तालुक्यात कोणत्याही गावात लाईट नसली तरी खोडजाईवाडी विजेच्या लख प्रकाशात उजळून निघत आहे. वीज वितरण कंपनीच्या थकीत बिलाबाबत खोडजाईकरांनी केव्हांच राम राम ठोकला आहे.

  गावाची वाटचाल विकासाच्या दिशेने
  ग्रामस्थांनी गटतट विसरून गावच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी पावले उचलल्याने गावाची वाटचाल विकासात्मक प्रगतीकडे जात असल्याचे खोडजाइवाडी हे गाव एकमेव उदाहरण कराड तालुक्यासाठी दिशादर्शक असेच ठरेल आहे. सुमारे ६५० लोकवस्ती असणाऱ्या गावात गत २५ वर्षातून यावर्षीचीच ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. गावातील सर्व ग्रामस्थ एकीने रहात असल्यानेच गावाचा विकास होण्यास मदत होत आहे. गावातील होतकरु असणाऱ्या युवकांना गावामध्ये ग्रामपंचायतीत काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने करत पदावर असणारे उपसरपंच तसेच सर्व सदस्य गावातील सर्व ग्रामस्थांना बरोबर घेवून गावचा विकास करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. भविष्यात संपूर्ण गाव सोलर सिटी म्हणून नावारूपास आणण्याचा ग्रामस्थांचा मनोदय असल्याचे सांगितले.

  यावेळी माजी सरपंच विमल पवार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मांडवे, कुसूम जाधव, शारदा साळुंखे, माजी सरपंच महेंद्र मांडवे, संभाजी मांडवे, बबन जाधव, बजीरंग कोकाटे, उत्तम मांडवे, यशवंत मांडवे, रामचंद्र पवार, भरत जाधव, हणमंत मांडवे उपस्थित होते.

  खोडजाईवाडी ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन नसल्याने महावितरणचे हजारो रुपये बील भरणे शक्य होत नाही. त्यामुळे विजबील भरले नाही तर बऱ्याचवेळा अंधाराशी सामना करावा लागत होता. यावर पर्याय म्हणून संपूर्ण गावामध्ये सोलर लँप बसवण्याचा निर्णय घेतला. माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगिता साळुंखे, माजी सनदीअधिकारी तानाजीराव साळुंखे यांनी विशेष सहकार्य केल्यामुळे आज आमचे गाव संपूर्ण प्रकाशमान झाले आहे.

  - सागर गोडसे, उपसरपंच खोडजाईवाडी

  कोणताही विकास अथवा प्रगती करायची असली तर गावात एकोपा असणे ही काळाची गरज आहे. या खोडजाईवाडी गावाची एकी हेच गावचे बळ असल्याने कोणतेही सामाजिक कार्य करण्यासाठी पुरूषांच्याबरोबरीने महीलाही हिरीरीने भाग घेवून गावचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतात म्हणूनच या गावासाठी माई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहे.

  - संगिता साळुंखे, संस्थपिका माई फाउंडेशन