ठेकेदाराचे अपहरण करून ऑनलाईन खंडणी घेणारे मोकाट; खंडणीखोर आरोपींना जेरबंद करण्याचे पोलीसांपुढे आव्हान

ठेकेदाराचे अपहरण करून ऑनलाईन खंडणी घेणारे मोकाट. खंडणीखोर आरोपींना जेरबंद करण्याचे पोलीसांपुढे आव्हान

  शिक्रापूर : सणसवाडी (ता.शिरुर) येथील कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन ऑनलाईन पद्धतीने दोन लाखांची खंडणी घेतली. याप्रकरणी गुन्हे दाखल होऊन देखील आरोपी दहा दिवसांपासून फरार असल्याने खंडणीखोर आरोपींना जेरबंद करण्याचे पोलीसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

  सणसवाडी (ता.शिरुर) येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे ठेकेदार फुलसिंग यादव हे चार एप्रिल रोजी कंपनीतून रात्रीच्या सुमारास पुन्हा घरी जात असताना दोन युवकांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून निर्जनस्थळी घेऊन जात शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण करत महेश जगताप माहित आहे का आम्ही त्याची माणसे आहोत, तुम्ही आम्हाला साडतीन लाख रुपये द्यायचे नाहीतर मारून टाकण्याची तसेच हत्याराने खून करण्याची धमकी दिली, दरम्यान फुलसिंग यादव यांनी त्यांच्या भावाकडून ऑनलाईन पैसे मागवून घेत सदर दोघे सांगतील त्या नंबरवर ऑनलाईन एक लाख रुपये पाठवले.

  तसेच फुलसिंग यांच्या भावाला देखील दोघांनी सांगितलेल्या खाते नंबर वर एक लाख रुपये पाठवण्यास सांगितले, अशा प्रकारे दोघांनी दोन लाख रुपये खंडणी घेतली तसेच अजून दीड लाख रुपये द्यायचे आणि महिन्याला पन्नास हजार रुपये द्यायचे, पोलिसांत तक्रार केली तर दोन महिन्यांनी बाहेर आल्यावर तुला खल्लास करुन टाकू अशी धमकी देऊन दोघेही निघून गेले.

  घडलेल्या प्रकाराबाबत फुलसिंग रेवती यादव (वय ४७ वर्षे रा. श्रीरामनगर चाकण ता. खेड जि. पुणे मूळ रा. कुटखेडा ता. बयाना जि. भरतपूर राजस्थान) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पिंपळे जगताप च्या माजी सरपंच यांचा मुलगा महेश जगताप (रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) याच्यासह दोन अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल केले मात्र गुन्हे दाखल होऊन दहा दिवस उलटून देखील आरोपी अद्याप फरार असल्यामुळे खंडणीखोर आरोपींना जेरबंद करण्याचे पोलीसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

  सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे करत आहे.

  लवकरच आरोपी जेरबंद केले जातील

  शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खंडणीचे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींचा आम्ही शोध घेत असून सध्या देखील आरोपींचा शोध सुरूच आहे. लवकरच या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद केले जातील असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे यांनी सांगितले.