kilbil mahotsav

डोंबिवलीच्या (Dombivali) सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत डोंबिवलीकर किलबिल महोत्सव (Kilbil Mahotsav) म्हणजे बाळगोपाळांसाठी हक्काचा असतो. लहान मुलांना खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेवर आधारित या धमाल कार्यक्रमाचे यंदाचे १० वे वर्ष आहे.

    मुंबई: डोंबिवलीकर (Dombivali) बाल दोस्तांच्या आवडीचा किलबिल महोत्सव (Kilbil Mahotsav) १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा धमाल मजा मस्तीची संध्याकाळ घेऊन येणार आहे. डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत डोंबिवलीकर किलबिल महोत्सव म्हणजे बाळगोपाळांसाठी हक्काचा असतो. लहान मुलांना खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेवर आधारित या धमाल कार्यक्रमाचे यंदाचे १० वे वर्ष आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या संकल्पनेतील किलबिल महोत्सव म्हणजे बालगोपाळांचा कॅलेंडरमधील मौज मजा धमाल मस्तीचा दिवस असतो. या अविस्मरणीय महोत्सवात धाडसी खेळ विशेष आकर्षण ठरत आहेत.

    केवळ लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दहा वर्षांपूर्वी डोंबिवलीकर किलबिल महोत्सवाची संकल्पना सुरू केली. मुलांना चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर यासोबत कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी, वायरची खेळणी स्वतः बनवता येणार आहेत तसेच बालनाट्य, जादूचे प्रयोग यासारखे कार्यक्रमही पाहायला मिळणार आहेत.  तनुरा ॲक्ट हा अद्भुत कलाप्रकार बाळगोपाळांना आकर्षित करेल अशी खात्री आहे. मिकी माऊस, टेडी बेअर छोट्या दोस्तांच्या चेहऱ्यावरील हास्य खुलवतील.
    तर साहसी खेळांमध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग असे थरारक प्रकार अनुभवायला मिळणार आहेत.

    यंदा दोन सेगवे व्हेइकल्सचा थरार पण मुलांना अनुभवायला मिळणार आहे. तांदळावर नाव कोरणे, मेंदी, लाखेच्या बांगड्या बनवून मिळणार आहेत. विशेष म्हणजे सर्व खेळ आणि सुविधा डोंबिवलीकर बाळ गोपाळांसाठी मोफत आहेत. किलबिल महोत्सव रविवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते १० दरम्यान डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरातील रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.