The husband killed the youth's father after seducing his wife, the mystery of the murder was revealed.

मृतकाचा मोठा मुलगा सिकंदर पाटील याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे पळवून नेले व भद्रावती येथे माझ्या पत्नीसह राहात असल्याचे सांगितले. तो आपल्याला आढळून आला नसल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी सिकंदरच्या वडिलांना साथीदारांसोबत महावीर शाळेतील पूर पीडितांच्या कॅम्पमधून चारचाकी वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून कोराडी नाल्याच्या पूलाजवळ नेत हत्या केल्याचे कबूल केले.

  भद्रावती : पत्नीला प्रेमसंबंधाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणाऱ्या मुलाचा वचपा काढण्यासाठी त्याच्या वडिलांची  हत्या केल्याची खळबळजनक घटना माजरी पोलीस ठाण्यांतर्गत (Majri Police Station) उघडकीस आली आहे. या प्रकरणी माजरीच्या आशिष उर्फ पिंटू प्रदीप पेटकर (३२) या आरोपीवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. परंतु, पोलिसांच्या चौकशीत हा खून असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासाअंती नागलोन शेतशिवारातील हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

  माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वणी – वरोरा महामार्गावरील (Wani – Warora Highway) नागलोन शेतशिवारातील (Naglon Farm ) कोराडी नाल्याच्या ( koradi nala) पुलाखाली एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह २१ जुलैला आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजाला जबर मारहाण केल्याचे दिसून आले. त्यानुसार माजरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासा संदर्भातील निर्देश दिले.

  त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी (Sub Divisional Police Officer Ayush Nopani) यांच्या नेतृत्वात माजरी पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असता, माजरी कॉलरी येथील सिकंदर रामभाऊ पाटील यांनी मृतक त्यांचे वडील रामभाऊ ज्ञानेश्वर पाटील असल्याचे सांगितले. मृतकाची ओळख पटल्यानंतर सिकंदर पाटील याला विचारणा केली. माजरी कॉलरीतील पिंटू पेटकर याच्या पत्नीसोबत आपले प्रेमसंबंध असल्यामुळे आरोपी पिंटू हा नेहमी वादविवाद करीत होता व कुटूंबाला मारण्याची धमकी देत असल्याचे सांगितले. मृतकाच्या मुलाच्या माहितीवरून आशिष उर्फ पिंटू प्रदीप पेटकर याला ताब्यात घेवून कसून चौकशी केली.

  अंत्यविधीला आल्यावर त्यालाही ठार मारणार होता

  चौकशीदरम्यान, मृतकाचा मोठा मुलगा सिकंदर पाटील याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे पळवून नेले व भद्रावती येथे माझ्या पत्नीसह राहात असल्याचे सांगितले. तो आपल्याला आढळून आला नसल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी सिकंदरच्या वडिलांना साथीदारांसोबत महावीर शाळेतील पूर पीडितांच्या कॅम्पमधून चारचाकी वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून कोराडी नाल्याच्या पूलाजवळ नेत हत्या केल्याचे कबूल केले. पत्नीला पळवून नेल्यामुळे मुलाचा बदला घेण्याकरिता कट रचून वडिलाला ठार मारले. वडिलाच्या अंत्यविधीला त्याचा मुलगा सिकंदर पाटील घरी येणार त्यावेळी त्याला सुद्धा ठार मारणार असल्याचे चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले. यावरून माजरी पोलीस ठाण्यात आशिष पेटकर याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

  आरोपीला पाच दिवसांचा ‘ पीसीआर’

  नागलोन शेतशिवारातील हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी आशिष उर्फ पिंटू प्रदीप पेटकर याला वरोरा येथील न्यायालयात हजर केले असता, पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, न्यायालयातून आरोपीला परत आणले जात असताना माजरीकडे जाणारा कोढा मार्ग बंद असल्याने त्याला भद्रावतीच्या कोठडीत ठेवले होते. भद्रावती व वरोरा तालुक्यातील पूर परिस्थिती असल्याने या प्रकरणाच्या तपासातही अडचणी येत असल्याचे माजरीचे ठाणेदार विनीत घागे यांनी सांगितले.