पूर्ववैमनस्यातून डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार करून एकाची हत्या; घोटी शहरातील घटना

घोटी शहरात पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी रात्री घोटी येथील जुन्या कोल्हार घोटी रोडवरील रामरावनगर (Igatpuri Crime) येथे ही घटना घडली.

    इगतपुरी : घोटी शहरात पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी रात्री घोटी येथील जुन्या कोल्हार घोटी रोडवरील रामरावनगर (Igatpuri Crime) येथे ही घटना घडली. तीन ते चार जणांच्या टोळक्याने प्रमोद गंगाराम शिंदे (३६ वर्ष, रा. रामरावनगर) याच्यावर कोयत्याने वार केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

    याप्रकरणी प्रमोदचा भाऊ अमोल शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. १३) मयत प्रमोद शिंदे व संशयित कृष्णा उर्फ गणपत विनायक बोराडे, वैभव उर्फ बॉडी विनायक बोराडे यांच्यामध्ये रात्री हॉटेल मोरया समोर भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून संशयित कृष्णा विनायक बोराडे, वैभव विनायक बोराडे यांनी मंगळवारी (दि. १४) मध्यरात्रीच्या सुमारास प्रमोद शिंदे घरी जात असताना त्याला गाठून कोयत्याने त्याच्या मानेवर, डोक्यावर व चेहऱ्यावर वार केले.

    या घटनेत प्रमोद शिंदेचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे खून झालेला तरुण आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. यापूर्वी खून केलेल्या एका तरुणाला इगतपुरी पोलीसनी तीन गावठी पिस्टलसह अटक केली होती. या घटनेनंतर पोलीस उपअधिक्षक सुनील भामरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. हत्येच्या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले असून, आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले.