kirit somaiya

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे साई रिसॉर्टचे (Sai Resort) बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते.

    राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांकडून (Kirit Somaiya) आता शिवसेनेतील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात सोमय्या आक्रमक झाले आहेत. परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या आज शेकडो कार्यकर्त्यांसह दापोलीत दाखल झाले आहेत. हातोडो घेऊन ते दापोलीत दाखल झाले आहेत.

    महाविकास आघाडी सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. त्याशिवाय, या रिसॉर्ट खरेदी प्रकरणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि ईडीकडे तक्रार केली होती. साई रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी परब यांनी कुठून पैसे घेतले याचाही तपास होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

    काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. आज दापोली दौऱ्यासाठी सोमय्या हे ट्रेनने सकाळी ७.५५ वाजता ठाण्याकडून खेडकडे रवाना झाले. सकाळी ११.४८ वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकात ते पोहोचले. खेड ते दापोलीपर्यंत ठिकठिकाणी त्यांच्यासाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दापोलीमधील मुरुड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साई रिसॉर्टला सोमय्या यांनी भेट दिली आहे.