किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापुरात; मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर सोमय्या प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर

राष्ट्रवादी (Ncp) काँग्रसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने (ED) केलेल्या कारवाईनंतर पाच दिवसांनी भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुश्रीफांनी या दौऱ्याला विरोध होणार नाही, त्यांनी खुशाल यावं असं सांगितले असले, तरी कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेता तणाव निर्माण होणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

    कोल्हापूर :  जिल्ह्यातील राष्ट्रवादी (Ncp) काँग्रसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने (ED) केलेल्या कारवाईनंतर पाच दिवसांनी भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुश्रीफांनी या दौऱ्याला विरोध होणार नाही, त्यांनी खुशाल यावं असं सांगितले असले, तरी कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेता तणाव निर्माण होणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

    गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना किरीट सोमय्या यांच्याकडून टार्गेट केले जात आहे. सातत्याने त्यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवताना ईडी कारवाई होणार असे सांगत आले आहेत. बुधवारी हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. कागल, कोल्हापूर आणि पुणे अशा तीन ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान, किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने उद्या कोल्हापुरात पोहोचतील. यानंतर ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची भेटीगाठी करून सातारसाठी दुपारी दोनच्या सुमारास रवाना होणार आहेत.

    किरीट सोमय्या यांना अडवणार नाही

    हसन मुश्रीफ शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरून तसेच किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात यावे. अंबाबाईचे दर्शन घ्यावं आणि आम्ही केलेल्या कामांचा देखील आढावा घ्यावा. आमचा एकही कार्यकर्ता किरीट सोमय्या यांना अडवणार नाही. अधिकाऱ्यांवर दबाव असतो त्यामुळे या छाप्यादरम्यान त्यांची कोणतीही चूक नाही.

    मुश्रीफ घाई नको, तुमचा नंबर दुसरा : किरीट सोमय्या

    एकूण १५८ कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ यांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे. विविध साखर कारखान्यांमध्ये घोटाळे झाले आहेत आणि ते सर्व घोटाळे इंटरलिंक आहेत, असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. केवळ हसन मुश्रीफच नाहीत अनिल परबही आहेत आणि त्यानंतर अस्लम शेख यांचा नंबर लागेल, अशीही स्पष्टोक्ती किरीट सोमय्यांनी दिली आहे.