विधवा प्रथाबंदीची ग्रामसभेत प्रत्यक्ष कार्यवाही करणारे तालुक्यातील पहिले गाव ठरले किरकसाल

विधवांना समाजात मानसन्मान देण्यासाठी किरकसाल ता .माण येथील ग्रामसभेत विधवा प्रथाबंदीची प्रत्यक्षात कार्यवाही करून इतरांपुढे आदर्श ठेवण्यात आलाय.यावेळी गावातील विधवांना हळदी कुंकू लावून हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या.यावेळी संपूर्ण वातावरण भावनिक होऊन गेले होते.

    दहिवडी : विधवांना समाजात मानसन्मान देण्यासाठी किरकसाल ता .माण येथील ग्रामसभेत विधवा प्रथाबंदीची प्रत्यक्षात कार्यवाही करून इतरांपुढे आदर्श ठेवण्यात आलाय.यावेळी गावातील विधवांना हळदी कुंकू लावून हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या.यावेळी संपूर्ण वातावरण भावनिक होऊन गेले होते.
    सरपंच सौ शोभा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली येथील हनुमान मंदिरात आज सकाळी ग्रामसभा बोलाविण्यात आली होती.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी डी बी भोसले,माजी सरपंच अमोल काटकर,पोलीस पाटील दत्तात्रय रसाळ,उमेदच्या समन्वयक दिपाली मासाळ,कृषी सहाय्यक प्राची निकाळजे,सुनील काटकर,निवृत्ती काटकर,ग्रामसेवक विकास गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

    सुरुवातीला अमोल काटकर यांनी विधवा प्रथा ही अनिष्ट प्रथा असल्याचे सांगून ही बंद करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली.किरकसाल मध्ये ही प्रथा बंद करण्याबाबत उपस्थितांनी हात उंचावून समर्थता दाखविल्यानंतर सरपंच सौ शोभा कुंभार यांनी विधवांना हळदी कुंकू लावले.यावेळी सर्वचजण भावुक झाल्याने वातावरणात गंभीरता निर्माण झाली होती. त्यानंतर मनाच्या हिरव्या बांगड्या देखील भरण्यात आल्या.या प्रथाबंदीचा ग्रामसभेत एकमुखाने ठराव करून प्रत्यक्ष कार्यवाही करणारे किरकसाल हे माण तालुक्यातील पाहिले व जिल्ह्यातील तिसरे गाव आहे.गावातील सर्व कार्यक्रमात विधवा महिलांना सामावून घेण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

    यावेळी बोलताना सहाय्यक गटविकास अधिकारी डी बी भोसले म्हणाले,शासनाकडून नवीन उपक्रमाची तालुक्यातील सुरुवात किरकसाल मधूनच होत असल्याची बाब अभिनंदनीय आहे.स्त्री शक्ती ही खूप महान शक्ती आहे.येथील विधवा प्रथाबंदीची कार्यवाही संपूर्ण तालुक्यात राबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न करू.विधवा होणे ही महिलेची चूक नाही.त्यामुळे ही अनिष्ट रूढी बंद करणे आवश्यक आहे.पंधरा वित्त आयोगातून विधवा महिलांच्या विकासासाठी तरतूद करावी.