प्रचारात आता राजकीय धुळवड; आत्म्यापासून विठ्ठलापर्यंत जयजयकार; मतदारांपुढे ʻकोणता झेंडाʼ प्रश्न

निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करत वेगवेगळ्या उपमा देत चर्चा घडवून आणण्याचे राजकारण्यांचे प्रयत्न नवे नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'भटकती आत्मा' अशा उल्लेखानंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुण्यात मोदी यांचा उल्लेख ʻवखवखलेला आत्माʼ असा केला.

  पुणे / दीपक मुनोत : निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करत वेगवेगळ्या उपमा देत चर्चा घडवून आणण्याचे राजकारण्यांचे प्रयत्न नवे नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘भटकती आत्मा’ अशा उल्लेखानंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुण्यात मोदी यांचा उल्लेख ʻवखवखलेला आत्माʼ असा केला असून, त्यांची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर निवडणुकीत धुलवड सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

  मोदी यांनी पुण्यात रेसकोर्सवरील सभेत ‘ एका भरकटलेल्या आत्म्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे राज्य अस्थिर झाले ‘ अशी टीका केली होती. आजही महाआघाडी आणि इंडिया आघाडीसाठी देशभरात भ्रमण करणाऱ्या शरद पवार यांच्या विषयी अशा प्रकारचे झोंबरे वक्तव्य झाल्यानंतर स्वतः पवार यांनी ‘ माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरे आहे. मात्र तो स्वार्थासाठी नाही तर शेतकऱ्यांचे दुखणे पाहून मी अस्वस्थ आहे’ असे जाहीर सभेत म्हटले होते.

  तर ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल! नांदतो केवळ पांडुरंग!’ या उल्लेख करत पवार यांचे नातू, आमदार रोहित पवार यांनी मोदींवर निशाणा साधला असून, पवार यांची साक्षात विठ्ठलाशी तुलना केली आहे.

  “मोदीजी महाराष्ट्र हे आमचे शरीर म्हणजेच पंढरी आहे.‌विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचे आसन अस्थिर झाल्याचे लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली. पण इथे येऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला अस्थिर आत्मे दिसू लागले. आता ४ जूननंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या,” असा टोला रोहित पवारांनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन लगावला आहे.

  मोदी ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि सुनेत्रा पवार हेही व्यासपीठावर होते. मात्र अजित पवार यांनी मोदी यांनी ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख कोणाबद्दल केला हे माहीत नाही,असा दावा पत्रकारांशी बोलताना केला. त्याबद्दल मोदी यांनाच विचारुन तुम्हाला सांगतो असे सांगायला सुध्दा ते विसरले नाहीत.

  ५ वर्षांपूर्वी निवडणूक सभेत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी यांचा नामोल्लेख टाळत ‘पनौती’ आणि ‘जेबकतरा’ असे उल्लेख केले. त्याबद्दल त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी ‘वखवखलेला आत्मा ‘ असा मोदी यांचा उल्लेख केला असून मोदी यांची तुलना गुजरात मध्ये जन्मलेल्या औरंगजेबाशी केली आहे. यावरुन भारतीय जनता पक्ष किंवा निवडणूक आयोग कोणत्या हालचाली करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.