कोकणात घरोघरी गणेशोत्सवाचा आनंद शिगेला, पारंपारिक पद्धतीने शेकडो वर्षाची परंपरा, वाड्या-वस्त्यांवर आरती, भजनांचे सूर

कोकणी गणेशोत्सवाला आगळावेगळा परंपरेने नटलेला महोत्सव म्हणतात. या गणेशोत्सव काळात आनंद, उत्साह, भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

  सिंधुदुर्ग – भगवान लोके : कोकणातील गणेशोत्सव हा आगळे वेगळ्या परंपरेने नातेलेला महोत्सव असतो. गणेश चतुर्थी निमित्त कोकणातील सर्वच गाव आणि वाड्या – वस्त्यांवर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. कारण प्रत्येक घरामध्ये विघ्नहर्ता देवता म्हणजेच श्री गणेशाचे आगमन झाले आहे. घराघरात भजन, आरती, डबलबारी भजन, फुगडी अशा विविध अंगाने पारंपारिक लोककला सादर केल्या जातात. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भजन, आरती, फुगड्यांचा सूर ऐकायला मिळत आहे. घरोघरी गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहचलेला आहे. कोकणात पारंपारिक पद्धतीने शेकडो वर्षाची परंपरा आजही नव्या पिढीच्या काळातही परंपरा जोपासणारे कोकण पाहायला मिळत आहे.

  कोकणात भजनी लोककला आजही जोपासली जाते त्या परंपरेला नव्या स्वरूपाचे दिवस आले आहेत. विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी गावागावात भजनाचे मधुर सूर ऐकायला येतात. भजनी मंडळ प्रत्येक घरगुती गणपतीला भजन करत जागर करण्याची एक प्रथा आहे. हरिनामाचा गजर करत भजनी बुवा आपली परंपरा बदलत्या काळात जोपासत आहेत. आरत्या, फुगड्या, डबलबारी भजनाचे सामने अशी विविध लोककला सादर बाप्पा समोर केली जात आहे.

  १९ सप्टेंबरला घरोघरी गणपतीचे आगमन झाले. लाखो चाकरमानी आपला कामधंदा बाजूला ठेवत आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. त्यामुळे सर्व वाड्या वस्त्यांवर बंद घरे उघडलेली दिसत आहेत. बापाच्या समोर भजन सेवेतून हरिनामाचा गजर केला जात आहे. सर्व जण उत्साहाने, भक्तिभावाने त्या भजन, आरती कारणासाठी मोठ्या आनंदाने सहभागी होतात. गणेश चतुर्थी कालावधीत रात्री जागवत बाप्पांचे भजने, आरत्या सादर करत गणपती बाप्पा समोर आशीर्वाद मागितले जातात. भजन हरीनाम सादर करताना वारकरी, संगीत असे सादरीकरण रुपक, गजर, अभंग, भारुड, गौळण या स्वरूपात बुवा करतात. हे करताना गणेश भक्तांचे मनोरंजन केले जाते. भजनातून बाप्पाच्या चरणी लीन होत भक्त रात्र भर जागर करतात.

  कोकणात गरीब असो वा श्रीमंत मात्र गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जातो. कारण कोकणातील माणसंही श्रद्धेची पाईक असता. त्यामुळेच कोकणी गणेशोत्सवाला आगळावेगळा परंपरेने नटलेला महोत्सव म्हणतात. या गणेशोत्सव काळात आनंद, उत्साह, भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. वाड्यावर त्याचबरोबर वस्त्यांवर भजन आरतीचा गजर होताना ऐकायला मिळत आहे. प्रत्येकाच्या घरातून स्पीकर द्वारे विविध गणपतीची भजने, बुवांच्या डबलबारी भजनांचे सादरीकरण होत असल्याने एक प्रकारे जल्लोषी उत्साही वातावरण प्रत्येक घराघरात निर्माण झाले आहे. गावागावात भजनी बुवा हरिनामाचा सादर करतात. भजन ही सांघिक कला असून त्यामध्ये गायक, वादकांसोबत कोरस या सर्वांचे महत्त्व आहे. या भजनात नामावली, रुपावली, अभंग, गौळण, भारुड असे बुवा सादरीकरण करतात. नामावली म्हणजे नामाचे महत्त्व सांगणारा अभंग, रूपावली म्हणजे परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणारा अभंग, त्यातही अभंगाचे भक्ती स्वरुपात विविध भजने सादर बुवा करत आहेत. या भजन सादर करताना हार्मोनियम (पेटी), पखवाज, तबला, मृदंग, टाळ, झांज हे वाद्य संगीत व वारकरी भजन संस्कृती जपताना ताळ, नाल या पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो.

  लोककला जोपासताना भक्तांचा उत्साह दांडगा…

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच घरोघरी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची प्रथा आहे. आपल्या बाप्पा समोर भजनाचा जागर होताना आलेल्या भजनी कलाकारांना यथोचित खानपाण करण्याची पद्धत असते. भजन केल्यानंतर सर्व मंडळीला करंज्या, लाडू, मिसळपाव, उसळ पाव, बटाटा वडा, पोहे, समोसा असे पदार्थ वाटले जातात. ही एक वेगळी संस्कृती कोकणात आजही जोपासली जाते. त्याचा आनंद चाकामानी आवर्जून घेताना दिसतात. कोकणातील या गणेशोत्सवाला कुठेही तोड नसते कारण हा अमाप उत्साह देणारा गणेश चतुर्थीचा सण कोकणी परंपरेने नटलेला आहे.