पेण मध्ये भाजपला खिंडार : माजी नगराध्यक्षांसह ६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पेण शहरांमध्ये भाजपला जोरदार खिंडार पडले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखाली ६ विद्यमान नगरसेवक व ५ माजी नगरसेवकांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.

पेण : पेण शहरांमध्ये भाजपला जोरदार खिंडार पडले आहे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखाली ६ विद्यमान नगरसेवक व ५ माजी नगरसेवकांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड, तालुका अध्यक्ष दयानंद भगत  माजीनगरसेवक जितेंद्र ठाकूर, विलास मनोरे, दीपक गुरव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पेण येथील गांधी मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, वसुधा पाटील, राजेंद्र वाडकर, मंगेश पेडामकर, अर्पिता कुंभार, भावना बांधणकर, प्रतिभा जाधव या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक हबीब खोत, कृष्णा भोईर,   बाळकृष्ण नाईक, तुकाराम पाटील व पांडुरंग जाधव, वाहीद खोत, रफिक झटाम, विशाल बाफना, तजीम मुकादम, भूषण कडू , किरण शहा, प्रसन्न पोटे, निकित पाटील, संजय कांबळेे, सुरेश म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

याप्रसंगी खा. सुनील तटकरे यांनी  प्रवेश केलेल्या सर्व आजी-माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण शहर अध्यक्ष अस्लम नाईक यांचे नुकतेच कोरोनामुळे दुःखद निधन झाले असल्याने त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कोरोना महामारीचा योग्य प्रकारे मुकाबला सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार झटका दिला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः तसेच मी व इतर मंत्र्यांनी रायगड जिल्ह्याच्या वादळग्रस्त भागाचा दौरा करून ३५० कोटी रुपयांची मदत वादळग्रस्तांना शासनाच्या माध्यमातून दिली आहे. या चक्रीवादळात गणपती कारखानदारांचे हि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांनासुद्धा मदत देण्यात आली आहे. खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व खारबंदिस्तीचा प्रश्न सोडविण्याकरिता प्राधान्याने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पेण शहराची नवीन ओळख मुंबईचे उपनगर म्हणून होणार आहे. त्यामुळे पेण शहरासह रायगड जिल्ह्याचा विकास करण्याकरिता शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. रायगड चे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे असले तरी सर्वांना विश्वासात घेऊनच कामे केली जातात असेही त्यांनी स्पष्ट केले.