रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा

समूहाचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक असलेल्या मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त केले आहे. नवनव्या क्षेत्रात विस्तारण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या मुकेश अंबानी यांच्याकडून आज कोणती नवी घोषणा होणार याची रिलायन्सच्या सभासदांना आणि गुंतवणूकदारांना उत्सुकता लागली आहे.

    मुंबई :  भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काही महत्वपूर्ण घोषणा करु शकतात. यापैकी सर्वात जास्त उत्सुकता ही रिलायन्स जिओच्या सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोनबद्दल आहे. रिलायन्सकडून AGM च्या व्यासपीठावरून हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. याशिवाय, जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अराम्कोशी व्यवहारासंदर्भातही या बैठकीत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    भांडवली बाजारातील बड्या उद्योग समूहापैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज गुरुवारी २३ जून २०२१ रोजी होणार आहे. आज दुपारी २ वाजता ही सभा होणार असून रिलायन्स समूहाच्या ट्विटर, फेसबुक, युट्यूब या सोशल मीडिया अकाउंटवरुन सभासदांना सभेमध्ये सहभागी होता येईल.

    समूहाचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक असलेल्या मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त केले आहे. नवनव्या क्षेत्रात विस्तारण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या मुकेश अंबानी यांच्याकडून आज कोणती नवी घोषणा होणार याची रिलायन्सच्या सभासदांना आणि गुंतवणूकदारांना उत्सुकता लागली आहे.

    देशभरात जिओचे ४२ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. फाईव्ह-जी सेवेला परवानगी देण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रिलायन्स जिओने देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. यासाठी रिलायन्स जिओने जगातील बड्या कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत रिलायन्स जिओ स्वत:च्या बळावर 5G चाचण्या करत आहे. तर पुण्यात रिलायन्सकडून नोकिया कंपनीची मदत घेतली जात आहे. तर दिल्ली आणि गुजरातमध्ये जिओकडून अनुक्रमे एरिक्सन आणि सॅमसंगच्या मदतीने संयुक्तपणे 5G नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत.