गौतमीच्या नृत्यावरून राजकीय थयथयाट; दिवाळी पहाटवर सुषमा अंधारेंची टीका

कथित लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम दिवाळी पहाटनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घेण्यात आला. तालावर लावणीच्या गौतमी थिरकली, गौतमीसोबत ठाण्यातील तरुणाईही थिरल्याचे दिसून आले.

    मुंबई : कथित लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम दिवाळी पहाटनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घेण्यात आला. तालावर लावणीच्या गौतमी थिरकली, गौतमीसोबत ठाण्यातील तरुणाईही थिरल्याचे दिसून आले. मात्र, दिवाळी पहाट कार्यक्रमात गौतमीचा डान्स झाल्यामुळे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

    तसेच, दिवाळी पहाटेचे हे नृत्य वंदनीय बाळासाहेबांनाच काय, अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल असे अंधारे यांनी म्हटले आहे. दिवाळी पहाटनिमित्त शिंदे गटातील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिने भन्नट नृत्य सादर केले.

    ठाण्यातील चिंतामणी चौकात या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी पहाट हा भक्तीमय आणि भजन गीत कार्यक्रमांनी साजरी होत असते. मात्र, दिवाळीच्या सुरेल, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाऐवजी थेट डीजेच्या तालावर लावणी नृत्याचा कार्यक्रम झाल्याने सोशल मीडियावरूनही टीका होत आहे.

    दरम्यान, यापूर्वी गौतमीने मुंबईतील दहीहंडी कार्यक्रमातही डान्स सादर केला होता. गौतमीच्या ठाण्यातील या कार्यक्रमावर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पं. बिस्मिल्ला साहेबांची सनई पं. भीमसेन जोशी यांचे भक्तीगीत किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळे ऐकून होतो. ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेबांनाच काय अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षित नसेल, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला.