हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, बार, पब, क्लबमध्ये पार्ट्यांत पाचपेक्षा जास्तजण एकत्र आल्यास कारवाई – गृहमंत्री

मुंबई पोलिसांकडून शहरात आठ दिवसांची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत ७ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी कलम १४४ लागू असेल. या काळात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. जे कोणी एकत्र जमतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

    मुंबई : देशासह राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळं राज्य शासनाने काही कडक निर्णय घेतले आहेत. राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची सध्याची संख्या वाढत आहे. नववर्षाचे स्वागत करीत असताना लोक मोठ्या संख्येने घराच्याबाहेर पडतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासनाने नववर्षाच्या स्वागतावर निर्बंध आणले आहेत, त्यामुळे लोकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.

    ओमायक्रॉन या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे, जबाबदारीने वागणे यामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल.

    दरम्यान आज दुपारी मुख्यमंत्र्यासोबत कृती दल समितीची बैठक होणार असून, यात काही कठोर निर्बंध तसेच कडक नियमावली सुद्धा जारी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी न्यू एयर सेलिब्रेशन घरच्या घरी साध्या पद्धतीने करावे, घराबाहेर पडू नये असं सुद्धा आवाहन राज्य शासनाने केले आहे.

    ओमायक्रॉनच्या या नव्या व्हेरिएंटमुळं कोरोनाचा धोका आणखी वाढला असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात टप्प्या-टप्प्यानं अनलॉक करण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं राज्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कोरोनाचा राज्यातील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरु शकणाऱ्या मुंबईत कठोर निर्बंध लादण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांकडून शहरात आठ दिवसांची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत ७ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी कलम १४४ लागू असेल. या काळात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही.